महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना यंदा रेनकोट दिले जाणार होते. मात्र त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची कोणतीही प्रक्रिया अद्याप न झाल्याचे महापालिकेच्या मुख्य सभेत बुधवारी स्पष्ट झाले. त्यामुळे रेनकोट नुसतेच चर्चेत राहिले. त्यानंतर संबंधित सर्वानी एकत्र येऊन रेनकोटसाठी निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव तयार करा, अशी सूचना महापौरांनी केली. त्यानुसार आता हा प्रस्ताव लवकरच तयार होईल.
महापालिकेची मुख्य सभा सुरू होताच तातडीचा मुद्दा म्हणून शिवसेनेचे पृथ्वीराज सुतार यांनी शालेय विद्यार्थ्यांना रेनकोट देण्याचा विषय उपस्थित केला. मार्च महिन्यात पालिकेचे अंदाजपत्रक मंजूर करताना महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना रेनकोट देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच या खरेदीसाठी तरतूद नसली तरी अखर्चित तरतुदीतून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन अंदाजपत्रक मंजूर करताना देण्यात आले होते. त्याचे काय झाले, असा प्रश्न सुतार यांनी उपस्थित केला. त्यावर कोणत्या खर्चातून वर्गीकरण करायचे ते तुम्ही सुचवा, आम्ही ते मंजूर करायला तयार आहोत असा पवित्रा सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला. त्याला आक्षेप घेत तरतूद उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते ते पूर्ण झाले पाहिजे अशी भूमिका सुतार यांनी मांडली. त्यावर या विषयाशी संबंधित सर्वानी एकत्र येऊन योग्य प्रस्ताव तयार करावा असे महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी सुचवले.
याच मुद्याला अनुसरून भारतीय जनता पक्षाचे गटनेता गणेश बीडकर यांनी विद्यार्थ्यांना देण्याचे रेनकोट लांब, मंडळातील विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश, शालेय साहित्य आणि दप्तरेही देण्यात आलेली नाहीत, अशी तक्रार केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेता राजेंद्र वागसकर यांनीही विद्यार्थ्यांना गणवेश आणि शालेय साहित्य केव्हा मिळणार असा प्रश्न उपस्थित केला.
गणवेश, दप्तरे आदींच्या वाटपाबाबत निवेदन करताना अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप म्हणाले, की दप्तरे व गणवेश सोडून अन्य साहित्याचे वाटप सुरू आहे. काही साहित्य वाटून पूर्ण झाले आहे. विद्यार्थ्यांसाठी ६७ हजार दप्तरे मागवण्यात आली होती. त्यापैकी १२ हजार दप्तरे मिळाली असून, एक लाख ६७ हजार गणवेशांपैकी १० हजार गणवेश मिळाले आहेत. गणवेश व दप्तरे वाटपाचे काम ३१ जुलैपर्यंत पूर्ण होणार असून, त्या मुदतीत ठेकेदाराने पुरवठा केला नाहीतर ठेकेदारावर दंडात्मक कारवाई केली जाईल.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Jul 2015 रोजी प्रकाशित
पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना रेनकोट देण्यासाठी नव्याने प्रस्ताव
महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना यंदा रेनकोट दिले जाणार होते. मात्र त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची कोणतीही प्रक्रिया अद्याप न झाल्याचे महापालिकेच्या मुख्य सभेत बुधवारी स्पष्ट झाले.

First published on: 23-07-2015 at 03:10 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raincoat pmc school fund