पुणे : अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे ऐन दिवाळीच्या दिवसांत राज्याच्या काही भागांत पावसाने हजेरी लावली. सध्याही हे क्षेत्र कायम असून, दोन दिवस पावसाळी स्थिती कायम राहील. त्यानंतर दिवसाच्या तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. गेल्या २४ तासांत कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली.

अरबी समुद्रात सुरुवातीला श्रीलंकेच्या किनारपट्टीपासून कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते. त्यामुळे आठवडय़ापासून राज्यात पावसाची स्थिती आहे. दिवाळीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी कमी दाबाचे क्षेत्र तीव्र असल्याने या काळात कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांत काही भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली भागांतही काही ठिकाणी पाऊस झाला. मराठवाडय़ातही पावसाने हजेरी लावली होती. अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र सध्या मध्य-पूर्व भागात आहे. पुढील ४८ तासांत त्याची तीव्रता कमी होणार आहे. कोकणात आणखी दोन दिवस काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर मात्र राज्यात सर्वच ठिकाणी हवामान कोरडे होणार असल्याने दिवसाच्या कमाल तापमानात वाढ होईल. सध्या पावसाळी स्थितीमुळे मुंबई-पुण्यासह सर्वच भागांत दिवसाचे तापमान ३० ते ३२ अंशांपर्यंत आहे. कोरडय़ा हवामानात दिवसाच्या तापमानात वाढ, पण रात्रीच्या किमान तापमानात घट होण्याचा अंदाज आहे.