पावसाळा तोंडावर आल्याने आता डेंग्यू आणि स्वाइन फ्लू या दोन्ही आजारांना पुन्हा सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर दूषित पाण्यामुळे होणाऱ्या गॅस्ट्रो आणि कॉलरा या आजारांचे रुग्णही पावसाळ्यात वाढत असल्याने त्यांच्या प्रतिबंधासाठीही काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदवले आहे.
पालिकेच्या आकडेवारीनुसार जून महिन्यात डेंग्यूचे ८ रुग्ण सापडले आहेत, तर जानेवारीपासून आतापर्यंत आढळलेल्या डेंग्यूच्या रुग्णांची संख्या ३५ आहे. पालिकेच्या कीटक नियंत्रण विभागाचे प्रमुख डॉ. नरेंद्र ठाकूर म्हणाले, ‘पालिकेचे कर्मचारी घरोघरी फिरून सर्वेक्षण करत आहेत व जिथे डासांची उत्पत्ती होण्यासारखे पाणीसाठे दिसतील, तिथे तिथे औषध फवारणी करत आहेत. गेल्या ८ दिवसांत सुमारे ७०० सोसायटय़ांना आणि ५० बांधकाम व्यावसायिकांना डेंग्यूसाठी दक्षता घेण्याबाबत नोटिसा दिल्या आहेत. पाणी साठू न देणे, पाण्याच्या टाक्या बंद ठेवणे याबाबतच्या सूचना त्यांना देण्यात आल्या. पाणी साठण्याबद्दल काळजी न घेतल्यास पालिकेतर्फे दंड केला जाऊ शकतो.’
दीनानाथ रुग्णालयातील संसर्गजन्य रोगांचे तज्ज्ञ डॉ. भारत पुरंदरे म्हणाले, ‘डेंग्यूच्या हंगामातील सुरुवातीचे रुग्ण दिसू लागले आहेत. गेल्या आठवडय़ापासून मी डेंग्यूचे ५ रुग्ण पाहिले आहेत. स्वाइन फ्लूसदृश लक्षणे दिसणारे रुग्ण दिवसाला २ ते ४ तरी पाहायला मिळतात. स्वाइन फ्लू उन्हाळ्यात थोडा कमी होतो आणि पुन्हा पावसाळ्यापासून जुलै-ऑगस्टपर्यंत स्वाइन फ्लू राहतो. अधूनमधून पाऊस सुरू झाला की डेंग्यूला सुरुवात होते आणि तो जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत राहतो.’
पालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार स्वाइन फ्लूचा सध्या शहरात १ रुग्ण आढळला असून त्याला कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आले आहे, तर जानेवारीपासून आतापर्यंत स्वाइन फ्लूचे ८१९ रुग्ण आढळले आहेत.
सध्या टायफॉइड आणि विषाणूजन्य कावीळ जोरात!
गेल्या १५-२० दिवसांपासून टायफॉइडच्या रुग्णांची संख्या लक्षणीय रीत्या दिसू लागली असल्याचेही डॉ. भारत पुरंदरे यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘बाहेरचे अन्न खावे लागणारे तरुण, विद्यार्थी, बाहेरगावी गेल्यामुळे असे अन्न खावे लागलेले लोक हे टायफॉइडच्या रुग्णांमध्ये दिसत आहेत. टायफॉइडमध्ये साधारणपणे दर चार-सहा तासांनी थंडी वाजून ताप येणे, डोकेदुखी, अंगदुखी अशी लक्षणे दिसतात, काहींना पोटात दुखून जुलाबही होतात. हा आजार आठवडय़ापेक्षा अधिक काळ टिकतो, त्यातही चढत्या भाजणीने ताप चढत जातो, त्याला ‘स्टेप लॅडर पॅटर्न’ म्हणतात. विषाणूजन्य काविळीचे रुग्ण देखील वाढले आहेत. विषाणूजन्य काविळीत पोट दुखून जुलाब होणे, यकृताच्या जागी दुखणे, डोळे पिवळे होणे, अन्नावरची वासना जाणे, लघवी जर्द पिवळ्या रंगाची होणे अशी लक्षणे दिसतात. कांजिण्या आणि गोवर फेब्रुवारीत सुरू होतात, या आजारांच्या साथींचे रुग्णही सध्या तुरळक प्रमाणात दिसत आहेत.’
पावसाळ्याबरोबर गॅस्ट्रो, कॉलरा आणि लेप्टोस्पायरोसिसचे रुग्ण वाढत असल्यामुळे त्या दृष्टीने दूषित पाणी पिणे टाळावे, तसेच लेप्टोस्पायरोसिस टाळण्यासाठी साठलेल्या डबक्यांमधून जाणे टाळावे, असेही डॉ. पुरंदरे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rainy season illness doctor dengue
First published on: 20-06-2015 at 03:10 IST