महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा रद्द होणार की लांबणीवर पडणार याबाबत चर्चा सुरू असतानाच शहर मनसेच पदाधिकाऱ्यांकडून राज ठाकरे यांच्या सभेची घोषणा गुरुवारी करण्यात आली. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सकाळी दहा वाजता राज यांची सभा होईल. राज यांच्या सभेचे सकाळी आयोजन करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेले आव्हान मनसेकडून स्वीकारण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे.
आगामी महापालिका निवडणूक आणि अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात शनिवारी त्यांच्या जाहीर सभेचे नियोजन शनिवारी (२१ मे) करण्यात आले होते. पाच जून रोजीचा अयोध्या दौरा आणि मुंबई येथील सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे या सभेत उत्तर देतील, अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव राज मुंबईला परतल्याने सभा रद्द होणार की लांबणीवर पडणार याबाबत तर्कवितर्क लढविण्यास सुरुवात झाली होती. मात्र राज ठाकरे यांच्या सभेची अधिकृत घोषणा मनसे पदाधिकाऱ्यांकडून गुरुवारी करण्यात आली.
मशिदींवरील भोंग्याचा मुद्द्यावरून राज ठाकरे यांची मुंबई, ठाणे, औरंगबाद येथे जाहीर सभा झाली होती. या सभानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. ‘आम्ही सकाळी, दुपारी सभा घेतो. यांनी कधी दुपारी सभा घेतली आहे का, तसेच कधी कष्ट घेतले आहेत का, यांची सभा कधी होते तर संध्याकाळी होते,’ अशा शब्दात अजित पवार यांनी राज यांच्यावर निशाणा साधला होता. मात्र मनसे पदाधिकाऱ्यांनी सकाळी सभा आयोजित करून अजित पवार यांचे आव्हान स्वीकारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दरम्यान, सभेच्या नियोजनासाठी मनसे पदाधिकाऱ्यांकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे.