‘जो सत्तेत येईल आणि आमच्या मागण्या पूर्ण करण्याची तयारी दाखवेल त्यांच्याबरोबर आम्ही जाऊ. मात्र, काहीही झाले तरी काँग्रेसबरोबर जाणार नाही,’ असे वक्तव्य करून महायुतीमध्ये जाण्याचे संकेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी परिवर्तन पुरस्कार वितरण समारंभानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिले.
परिवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने दीपगृह फाउंडेशनच्या संस्थापिका डॉ. नीला ओनावळे यांना परिवर्तन पुरस्कार देण्यात आला. या वेळी परिवर्तन प्रतिष्ठानचे इंद्रनील सनलगे, तन्मय कानेटकर आदी उपस्थित होते. या वेळी आदित्य निलकंठवार यांना उदयोन्मुख कार्यकर्ता आणि दीपक टावरी यांना सर्वोत्तम कार्यकर्ता पुरस्कार देण्यात आला.
या वेळी शेट्टी म्हणाले, ‘‘आम्ही लोकसभेसाठी सहा ते सात जागा लढवणार आहोत. राष्ट्रीय दुष्काळ निवारण आयोगाची स्थापना व्हावी, कृषिमूल्य आयोगाला स्वायत्तता मिळावी, स्वामिनाथन समिती आणि रंगराजन समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी व्हावी, सिंचन घोटाळ्याची न्यायलयीन चौकशी व्हावी, सहकारी संस्था बंद पडत आहेत, त्याची चौकशी व्हावी, अशा आमच्या मागण्या आहेत. त्या पूर्ण करण्याची तयारी जो पक्ष दाखवेल त्यांच्याबरोबर आम्ही जाऊ. मात्र, कोणत्याही परिस्थितीमध्ये काँग्रेसबरोबर जाणार नाही.’’
या वेळी दिल्ली विधानसभेच्या निकालांबाबत बोलताना शेट्टी म्हणाले,  ‘‘दिल्लीच्या निवडणुकीचा निर्णय हा मतदाराला उभारी देणारा आहे. दिल्लीत विक्रमी मतदान झाले आणि लोकांनी स्वत:च्या विचाराने मतदान केले. त्यामुळे आपल्याला जवळच्या वाटणाऱ्या उमेदवाराला त्यांनी मते दिली. त्यामुळेच सर्वाना चक्रावणारे निकाल लागले आणि कधीही निवडून येऊ शकणार नाहीत, असे वाटणारी माणसे निवडून आली.’’
उसाच्या भावावर ठाम
उसाच्या २ हजार ६५० रुपये या दरावर ठाम असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. ‘‘साखर कारखान्यांना भीक लागली असेल, तर त्यांनी ऊस फुकट घ्यावा. मात्र, द्यायचे असतील, तर २ हजार ६५० रुपये दर मिळाला पाहिजे,’’ असे शेट्टी म्हणाले.