केंद्रीय राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांनी संविधानाबाबत केलेले विधान हे अत्यंत चुकीचे आहे. बेताल विधाने करून सरकारला अडचणीत आणण्याची भाजप नेत्यांना सवय आहे. त्यामुळे सरकारविरोधी भूमिका घेणाऱ्या हेगडे यांना भाजपने समज द्यावी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे रविवारी केली. संविधानाचे संरक्षण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मी आहे. मोदी सरकार आरक्षण संपुष्टात आणणार आणि संविधान बदलणार, असा अपप्रचार केला जात आहे. पंतप्रधान मोदी राज्यघटनेच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत, असेही आठवले यांनी सांगितले.

आठवले म्हणाले, की हेगडे यांच्या विधानावर संसदेत खुलासा करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संविधानाला धर्मग्रंथ मानतात. त्यामुळे सरकार संविधान बदलेल ही भावना चुकीची आहे.  कर्नाटक निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर हेगडे यांनी कदाचित हे विधान केले असावे.  संविधान बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना धडा शिकविण्यात येईल मात्र घटना बदलू दिली जाणार नाही.

‘क्रिमिलेअर’चा निकष लावून मराठा, जाट, लिंगायत, ठाकूर आणि पाटीदार समाजाला आरक्षण देता येणे शक्य आहे. मात्र अनुसूचित जाती आणि जमातींसह अन्य मागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यावे,’ असेही त्यांनी सांगितले.

शनिवार वाडा येथील एल्गार परिषदेसाठी गुजरात येथील आमदार जिग्नेश मेवाणी यांच्या कार्यक्रमाचे निमंत्रण नाही. त्यामुळे तेथे जाण्याचा प्रश्न नाही. मेवाणी हे आंबेडकरवादी असतील तर त्यांनी सवर्ण आणि दलितांना एकत्र आणण्याची भूमिका घ्यावी. समाजात तेढ निर्माण करणारी विधाने करू नयेत. मित्र वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आठवले म्हणाले.