पुणे : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे (एमएसबीटीई) उन्हाळी परीक्षा २०२२ मध्ये अखिल भारतीय तंत्रशिक्षण मान्यताप्राप्त अभियांत्रिकी तसेच औषधनिर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रमातील अंतिम सत्र, वर्षांतील अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी २१ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबरदरम्यान फेरपरीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना ५ ते ७ सप्टेंबरदरम्यान अर्ज भरता येणार आहेत. मंडळाचे सचिव डॉ. महेंद्र चितलांगे यांनी ही माहिती दिली. उन्हाळी सत्र २०२२ परीक्षेमध्ये अंतिम सत्र, वर्षांतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या अनुत्तीर्ण विषयांची, राहिलेल्या विषयांची (बॅकलॉग) फेरपरीक्षा विशेष बाब म्हणून मंडळाच्या प्रचलित पद्धतीने मंडळाने निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रांवर होईल.

मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ५ ते ७ सप्टेंबर या कालावधीत अर्ज भरणे, ५ ते ८ सप्टेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांचे अर्ज संस्थास्तरावर अंतिम करणे, ५ ते ९ सप्टेंबरदरम्यान विभागीय कार्यालयांनी अर्ज अंतिम करणे, १३ सप्टेंबरला परीक्षा ओळखपत्र आणि बैठकव्यवस्था जाहीर करण्यात येईल. १५ ते १७ सप्टेंबरदरम्यान तोंडी परीक्षा, तर २१ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबरदरम्यान लेखी परीक्षा होईल. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयांचे चांगले आकलन होण्यासाठी विषयनिहाय अतिरिक्त अध्यापन वर्ग संस्थास्तरावर आयोजित करण्यात येतील. संबंधित वर्गाना उपस्थित राहण्यासाठी अध्यापनांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फेरपरीक्षेपूर्वी संस्थास्तरावर विद्यार्थ्यांची सराव परीक्षा घ्यावी. विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेबाबत योग्य ते मार्गदर्शन करावे. फेरपरीक्षा मंडळाच्या नियमावलीप्रमाणे सुरळीतपणे पार पाडण्याची सर्वस्वी जबाबदारी संस्थेच्या प्राचार्याची राहील, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.