पुणे : राज्य शासनाच्या तंत्रशिक्षण विभागाकडून सेवाप्रवेशोत्तर परीक्षा आणि प्रशिक्षणासारख्या कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शन करणाऱ्या तज्ज्ञांची तुटपुंज्या मानधनावर बोळवण केली जात असल्याचे समोर आले आहे. २०११च्या शासन निर्णयानुसार तज्ज्ञ मार्गदर्शकांना तीन तासांच्या सत्रांसाठी १ हजार २५० रुपये दिले जात असून, राज्यातील तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकी महाविद्यालयातील घडय़ाळी तासिका तत्त्वारील (सीएचबी) प्राध्यापकांना दिल्या जाणाऱ्या मानधनापेक्षाही तज्ज्ञ मार्गदर्शकांना दिली जाणारी रक्कम कमी आहे.

राज्यातील तंत्रनिकेतनमधील सीएचबी प्राध्यापकांना दर तासाला पाचशे रुपये, तर अभियांत्रिकी महाविद्यालयातील सीएचबी प्राध्यापकांना दर तासाला सहाशे रुपये दराने मानधन दिले जाते. तंत्रशिक्षण विभागाकडून सेवा प्रवेशोत्तर परीक्षा आणि प्रशिक्षणासारख्या कार्यक्रमांमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शकांना निमंत्रित केले जाते. मात्र त्यांना तीन तासांच्या सत्रासाठी १ हजार २५० रुपये इतके कमी मानधन दिले जात असल्याचे नुकत्याच झालेल्या विभागीय सेवा प्रवेशोत्तर प्रशिक्षणातून समोर आले. या मानधनासाठी २०११च्या शासन निर्णयाचा संदर्भ देण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या अकरा वर्षांत तज्ज्ञ मार्गदर्शकांना दिल्या जाणाऱ्या मानधनाच्या दरांमध्ये वाढ झाली नसल्याचे दिसून येते.

शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन आयोगानुसार वेतन दिले जाते. मात्र शासकीय कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या तज्ज्ञ मार्गदर्शकांना अत्यंत तुटपुंजे मानधन दिले जाते. शासनाकडून वर्षांनुवर्षे त्यात वाढ केली जात नाही ही लाजिरवाणी बाब आहे. आता तरी परिस्थितीनुसार या मानधनामध्ये वाढ होणे आवश्यक आहे, असे एका तज्ज्ञ मार्गदर्शकांनी सांगितले.

तज्ज्ञ मार्गदर्शकांना दिले जाणारे मानधन कमी आहे हे मान्य आहे. मात्र शासन निर्णयानुसार मानधन द्यावे लागते. आता मानधनाचे दर सुधारित करून त्यात वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येईल. त्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास सुधारित दरानुसार मानधन दिले जाईल. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. डी. व्ही. जाधव, पुणे विभागीय सहसंचालक