सॅनिटरी नॅपकीन, डायपरच्या कचऱ्याचा धोका टाळण्यासाठी उपाय

कचऱ्यात येणारे वापरलेले सॅनिटरी नॅपकीन आणि लहान मुलांचे डायपर बांधलेल्या पुडय़ा कचरावेचकांकडून कचरा वेगळा करताना उघडल्या जाणे आणि इच्छा नसतानाही त्यांना हा कचरा हाताळावा लागणे ही नेहमीची गोष्ट. हे टाळण्यासाठी अनेक प्रयत्न केल्यानंतर आता कचरावेचकांच्या संघटनेने एक सोपा उपाय शोधून काढला आहे. सॅनिटरी नॅपकीन व डायपरच्या कचऱ्याची पुडी बांधून त्यावर ठसठशीत दिसेल असा लाल बिंदू करावा, म्हणजे कचरावेचक ती पुडी न उघडता वेगळी काढतील, अशी जनजागृती मोहीम ‘कागद-काच-पत्रा कष्टकरी पंचायती’ने (केकेपीकेपी) सुरू केली आहे. संघटनेने त्यास ‘रेड डॉट कॅम्पेन’ असे नाव दिले असून, घरोघरी फिरून कचरा उचलणाऱ्या महिला त्याविषयी नागरिकांना समजावून सांगणार आहेत.

वापरलेले सॅनिटरी नॅपकीन व डायपरचा कचऱ्याची फेरनिर्मिती करता येत नसते, शिवाय या गोष्टी प्रत्यक्ष हाताळणे किळसवाणे असल्यामुळे कचरावेचकांना त्याचा खूप त्रास होतो.

पुण्याचा विचार करता दर महिन्याला वापरल्या जाणाऱ्या सॅनिटरी नॅपकीनची संख्या साधारणत: २० लाख असून, संघटनेने तयार केलेल्या या पिशव्यांचा खप प्रतिमहिना केवळ ३० ते ४० हजार आहे.

‘रेड डॉट कॅम्पेन’ची माहिती

* सॅनिटरी नॅपकीन वा डायपरचा कचरा कागदाच्या पुडीत व्यवस्थित बांधा. पुडी उघडली जाईल, असे वाटत असल्यास  सेलोटेप लावा.

*  या पुडीवर लाल पेनाने ठसठशीत दिसेल असा लाल बिंदू काढा.

*  ही पुडी सुक्या कचऱ्यातच टाका, म्हणजे ती न हाताळता वेगळी काढली जाईल.

सॅनिटरी नॅपकीन व डायपर बनवणाऱ्या कंपन्यांनी त्याच्या विल्हेवाटीचीही जबाबदारी घ्यावी, या उद्देशाने अनेकदा कंपन्यांशी संपर्क साधला, त्याला प्रतिसाद न मिळाल्यामुळे २०१३ मध्ये कंपन्यांना नॅपकीन व डायपरचा कचरा परत पाठवला. काही कंपन्यांनी त्यानंतर हँडग्लोव्हज पुरवण्यास तयार असल्याचे सांगितले, परंतु अशी मदत कायमस्वरूपी नाही . त्यामुळेच या मोहिमेचा प्रस्ताव पुढे आला.

 – मालती गाडगीळ, कार्यकर्त्यां, केकेपीकेपी