सर्व नागरिकांना बारा अंकी ओळख क्रमांक देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या आधार कार्ड योजनेची प्रक्रिया महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सुरू करण्यात आली आहे. महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये तसेच मुख्य इमारतीमध्ये २६ नोव्हेंबपर्यंत नागरिकांना आधार कार्डसाठीची नोंदणी करता येईल.
शहरातील नागरिकांना आधार कार्ड देण्याच्या प्रक्रियेचा दुसरा टप्पा शहरात सुरू करण्यात आला होता. त्यासाठी लागणारी यंत्र महापालिका शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये ठेवण्यात आली होती. मात्र शाळांमध्ये सुरू करण्यात आलेल्या या योजनेला विशेष प्रतिसाद लाभला नाही, असे महापालिकेचे म्हणणे आहे. सध्या शाळांना दिवाळीची सुटी असल्यामुळे या यंत्रांचा कोणताही वापर सुरू नाही. अशा परिस्थितीत यंत्रांचा वापर करून नागरिकांची आधार कार्डसाठीची नोंदणी करणे सोयीचे व्हावे यासाठी शाळांमधील ही यंत्र महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार महापालिकेच्या पंधरा क्षेत्रीय कार्यालयांमध्ये तसेच महापालिका मुख्य इमारतीमध्ये आणि शिवाजीनगर येथील शासकीय धान्य गोदाम व पुणे जिल्हा परिषद इमारत येथे ही यंत्र ठेवण्यात येणार आहेत.
या सर्व ठिकाणी २६ नोव्हेंबपर्यंत आधार कार्डसाठीची नोंदणी सुरू राहणार असल्याचे कळवण्यात आले आहे. ज्या नागरिकांनी अद्यापही आधार कार्डसाठीची नोंदणी केलेली नसेल, त्यांनी महापालिका क्षेत्रीय कार्यालयांमध्ये नोंदणीसाठी संपर्क करावा, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Nov 2015 रोजी प्रकाशित
पालिका क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आधार कार्डसाठी नोंदणी सुरू
महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये तसेच मुख्य इमारतीमध्ये २६ नोव्हेंबपर्यंत नागरिकांना आधार कार्डसाठीची नोंदणी करता येईल

First published on: 22-11-2015 at 03:20 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Regional municipal offices registration aadhar card