पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय झाल्यानंतर शहरातील गुन्हेगारी कमी होण्याऐवजी वाढली आहे. चाकण, रांजणगावच्या औद्योगिक पट्टय़ातील खंडणीखोरी वाढल्याने परदेशी कंपन्या थांबायला तयार नाहीत. जागोजागी भंगारमाफिया तयार झाले आहेत. ही वाढलेली गुंडगिरी रोखण्यात सरकारला अपयश आल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी सांगवीत केली.
राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पवार यांच्या उपस्थितीत झाली. शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे, नगरसेवक दत्ता साने, भाऊसाहेब भोईर, नाना काटे आदी या वेळी उपस्थित होते.
पवार म्हणाले,की शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर आहे. नगरसेवकांवरील हल्ले वाढले आहेत. माथाडीच्या नावाखाली होणाऱ्या गुंडगिरीमुळे उद्योगधंदे चालवणे अवघड झाले आहे. भंगार मालाचे ठेके मिळवण्यासाठी मंत्रालयातून दूरध्वनी येत आहेत. सगळीकडेच गुंडगिरी वाढली आहे. अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीतील सहभाग चिंताजनक आहे.
पिंपरी पालिकेचा कारभार चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. शहरहिताचे आणि जनहिताचे निर्णय होत नाहीत. कचऱ्याच्या निविदांचा घोळ घातल्याने हा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे. १५-१५ दिवस कचरा उचलला जात नाही. शास्तीकराचा प्रश्न सुटल्याचा दावा खोटाच आहे. रेडझोनचा प्रश्न तसाच आहे. स्वच्छ भारत अभियानाचा नुसताच गाजावाजा असून सुंदर शहराची अवस्था वाईट शहरात करून ठेवली आहे. सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर वचक नाही.
पार्थच्या प्रश्नावर पवार भडकले
मावळ लोकसभेतील पराभवानंतर पार्थ पवार पुन्हा शहरात फिरकले नाहीत, पार्थचा पराभव पवार कुटुंबीयांसाठी मोठा धक्का होता का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर अजित पवार भडकले. पार्थपर्यंत तुमचा प्रश्न पोहोचवतो आणि त्याचे उत्तर तुम्हाला कळवतो, असे उत्तर देतानाच पार्थ एकटाच पराभूत झाला नाही. सर्व पराभूत उमेदवारांसाठी एकसारखेच दुख झाल्याचे पवारांनी स्पष्ट केले.