पुणे महापालिकेतील प्रमुख राजकीय घडामोडी आणि शहरासंबंधीचे सर्व निर्णय ज्या सभागृहात होतात, त्या श्री छत्रपती शिवाजीमहाराज सभागृहाचे नूतनीकरण पूर्ण झाले आहे. अत्याधुनिक सोयी-सुविधा आणि सुंदर सजावटीने हे सभागृह नटले असून या नूतनीकरणाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते शुक्रवारी (१७ जानेवारी) आयोजित करण्यात आले आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार सात वर्षांनंतर महापालिकेत येत असून २००७ साली एका सत्काराच्या निमित्ताने ते महापालिका सभागृहात आले होते. त्यानंतर ते आता सभागृह नूतनीकरण उद्घाटनासाठी येत आहेत. पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत असल्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादीमध्ये चांगलाच उत्साह गेले काही दिवस दिसत आहे.
सभागृहाच्या नूतनीकरणाचे काम ५ ऑक्टोबर रोजी सुरू करण्यात आले होते. या कामासाठी साडेतीन कोटी रुपये खर्च आला असून सभागृहाचा पूर्ण चेहरामोहरा आता बदलला आहे. सभागृहातील कामकाज चहूकडून पाहता यावे यासाठी तीन एलसीडी, मतदानासाठी इलेक्ट्रॉनिक यंत्रणा, हजेरी नोंदवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मशिन्स यासह अनेक सोयी-सुविधा नव्या सभागृहात आहेत. नगरसेवकांची पूर्वीची समोरासमोर बसण्याची रचना बदलून विधानसभेप्रमाणे अर्धगोलाकृती बैठक रचना करण्यात आली आहे. तीन टप्प्यांमध्ये ही रचना आहे. सभेत प्रेक्षागृहात बसलेल्या नागरिकांकडून उपद्रव होऊ नये यासाठी प्रेक्षक गॅलरीला जाड पारदर्शक काच बसवण्यात आली आहे.
उद्घाटनापाठोपाठ आयुक्तांचे अंदाजपत्रक
महापालिका सभागृहात शुक्रवारी दोन मोठे कार्यक्रम होत आहेत. सकाळी दहा वाजता सभागृह नूतनीकरणाचे उद्घाटन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते होईल. त्यानंतर आयुक्त महेश पाठक सन २०१४-१५ या आर्थिक वर्षांसाठीचे अंदाजपत्रक दुपारी सभागृहात सादर करतील. नव्या सभागृहाच्या कामकाजाची सुरुवात अंदाजपत्रकाच्या सभेने होईल.