पुणे : भिडे पूल परिसरात नदीपात्रातील उघड्या गटारात अडकलेल्या गाईला अग्निशमन दलातील जवानांच्या प्रयत्नांमुळे जीवदान मिळाले. झाकण नसलेल्या गटारात गाय पडल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी दोरीच्या सहाय्याने तिला बाहेर काढले.

खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्याने नदीपात्रातील भिडे पूल परिसरातील गटाराचे झाकण वाहून गेले होते. दुपारनंतर नदीपात्रातील पाणी ओसरण्यास सुरूवात झाली. त्या वेळी झाकण नसलेल्या गटारीत गाय पडल्याची माहिती अग्निशमन दलाला कळविण्यात आली. अग्निशमन दलाच्या कसबा केंद्राचे प्रभारी अधिकारी कमलेश चौधरी, थोरात, सुरेश पवार, पी. के. ढमाले, संतोष अरगडे, शुक्रे, पेडणेकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. गटारात पडलेल्या गाईला बाहेर काढण्यासाठी दोर सोडण्यात आला. मात्र, गटाराचा भाग अरुंद असल्याने गाईला बाहेर पडता येत नाही तसेच गटारात उतरणे अशक्य होते. जवानांनी टिकावाने गटाराचा भाग फोडला. गटारात दोर सोडून जवानांनी गाईला बांधले. अर्धा ते पाऊण तासांच्या प्रयत्नानंतर गाईला बाहेर काढण्यात यश आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गाय गटारात पडल्याची माहिती मिळाल्यानंतर गाईचा मालक तेथे आला. मालकाच्या ताब्यात गाय देण्यात आली असल्याची माहिती अग्निशमन दलाचे प्रभारी अधिकारी कमलेश चौधरी यांनी दिली.