मराठा क्रांती मोर्चाची आज पुण्यात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला खासदार छत्रपती संभाजारीजे संबोधित करणार आहेत. दरम्यान, या बैठकीला सुरवात झाली असुन मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत नीरज चोप्राचा सत्कार करण्याचा ठराव मांडण्यात आला. भारताच्या नीरज चोप्राने ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. नीरजने भालफेक स्पर्धेच्या अंतिम फेरी पहिल्याच प्रयत्नात ८७.०३ मीटर तर दुसऱ्या प्रयत्नात ८७.५८ मीटरपर्यंत भाला फेकत सुवर्णपदकावर नाव कोरलं.

“रोड मराठा नीरज चोप्राने ही कामगिरी केली आहे. प्रामुख्याने पानिपत लढाईसाठी गेलेल्या मराठा समाजाच्या वंशजांना आज रोड मराठा म्हणून ओळखल्या जाते. अश्या हरयाणा स्थित मराठा समाजात जन्मलेल्या नीरज चोप्रा याचे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने अभिनंदन,” असे फलक बैठकीत लावण्यात आले. दरम्यान, महाराष्ट्र राज्य सरकारने नीरज चोप्राचा सत्कार करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

ऑलिम्पिकचा ‘गोल्डन बॉय’ नीरज मराठ्यांचा वंशज

नीरजच्या या पराक्रमानंतर त्यांच्यासंदर्भात इंटरनेटवर अनेक गोष्टी सर्च केल्या जात अशतानाच नीरज चोप्रा रोड मराठा असल्याचंही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याचसंदर्भात मागोवा घेतला असता ‘हिंदुस्थान टाइम्स’ला नीरजने दिलेल्या प्रदीर्घ मुलाखतीमध्ये एक उल्लेख सापडतो.

या मुलाखतीच्या सुरवातीलाच नीरज हा रोड मराठा असल्याचा उल्लेख आहे. “काही शतकांआधी त्याचे (नीरजचे) पूर्वज हरयाणामध्ये स्थलांतरीत झाले. बाजीराव पेशव्यांनी पानिपतमध्ये लढलेल्या तिसऱ्या लढाईमध्ये ते लढले होते. नीरज हा याच रोड मराठ्यांचा वंशज असून भालाफेक या पूर्वापार चालत आलेल्या कौशल्याच्या मदतीने तो आपल्या पूर्वजांची परंपरा पुढे नेत आहे,” असं हिंदुस्थान टाइम्सच्या बातमीत म्हटलं आहे. हिंदुस्तान टाइम्सची ही संपूर्ण मुलाखत तुम्ही येथे क्लिक करुन वाचू शकता.

नीरज यापूर्वी कोणत्या स्पर्धांमध्ये जिंकलाय?

यापूर्वी नीरजने आशियाई खेळ, राष्ट्रकुल खेळ, आशियाई चॅम्पियनशिप, दक्षिण आशियाई खेळ आणि जागतिक कनिष्ठ स्पर्धेत सुवर्ण पदके जिंकली आहेत. नीरज चोप्राने आपले भालाफेक कौशल्य सुधारण्यासाठी जर्मनीच्या बायोमेकॅनिक्स तज्ञ क्लाऊस बार्टोनिट्झ यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आहे. तेव्हापासून त्याच्या कामगिरीत सातत्य राहिले आहे.