पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट परीक्षा विभागातर्फे आयोजित ४०व्या राज्य पात्रता परीक्षेचा (सेट) निकाल येत्या ३० ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे. परीक्षा होऊन दोन महिने झाले तरी निकालाबाबत काहीच स्पष्टता नसल्याने राज्यभरातील हजारो उमेदवारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. आता विद्यापीठाने निकालाचा दिनांक जाहीर केल्यामुळे उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.

विद्यापीठाच्या सेट विभागाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे माहिती दिली. महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील उमेदवारांसाठी सेट परीक्षा १५ जून रोजी आयोजित करण्यात आली होती. १८ शहरांमधील विविध परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा झाली. महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांसाठी सेट परीक्षा आयोजित करण्यासाठी विद्यापीठाचा सेट परीक्षा विभाग हा अधिकृत प्राधिकरण आहे. परीक्षा होऊन दोन महिने झाले, तरी निकाल जाहीर होत नसल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे मंगल वाली आंदोलन करून परीक्षेचा निकाल तातडीने जाहीर करण्याची मागणी केली. त्यानंतर सेट परीक्षाने परिपत्रक प्रसिद्ध करून निकालाची माहिती दिली. त्यानुसार ३० ऑगस्टला सेट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.