पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यात एकूण १ हजार ५१६ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले असून, आता मुलाखतीचा कार्यक्रम स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे. एमपीएससीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. निकालासह पात्रतागुणही प्रसिद्ध करण्यात आले आहेत. एमपीएससीतर्फे २७ ते २९ मे या कालावधीत राज्य सेवा मुख्य परीक्षा घेण्यात आली होती.

निकालानुसार मुलाखतीसाठी प्रथमदर्शनी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना त्यांच्या परीक्षेच्या अर्जातील दाव्यांच्या पृष्ठ्यर्थ मुलाखतीवेळी त्यांची पात्रता मूळ प्रमाणपत्रावरून तपासण्याच्या अटोच्या अधीन राहून मुलाखतीस बोलावण्यात येणार आहे. उमेदवारांनी अर्जात दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास अथवा अर्जातील दाव्यानुसार आवश्यक मूळ प्रमाणपत्रांची पूर्तता मुलाखतीवेळी न केल्यास, तसेच अधिसूचनेतील तरतुदीनुसार दावे तपासताना व अन्य कारणामुळे अपात्र ठरणाऱ्या संबंधित उमेदवारांची उमेदवारी, कोणत्याही टप्प्यावर रह करण्यात येईल.

राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या निकालानुसार मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी वैद्यकीय मंडळामार्फत करण्यात येईल, मुलाखतीस उपस्थित रहताना उमेदवारांस वैद्यकीय चाचणी पूर्ण केल्याचा पुरावा सादर करावा लागेल. या अनुषंगाने उमेदवारांना वैद्यकीय चाचणीची तारीख व ठिकाण लवकरच कळविण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

मुख्य परीक्षेमधून मुलाखतीकरीता अर्हताप्राप्त न ठरलेल्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपुस्तिकेतील गुणांची फेरपडताळणी करायची असल्यास संबंधित उमेदवारांनी गुणपत्रके प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून दहा दिवसांच्या आत आयोगाकडे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. परीक्षेचा निकाल आरक्षणाच्या समांतर आरक्षणाच्या, तसेच अन्य मुद्यांसंदर्भात विविध न्यायालयात, न्यायाधिकरणात दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणातील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात आला असल्याचे एमपीएससीने स्पष्ट केले.