पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात व्याख्यानमालांची चळवळ रुजवणाऱ्या व ती वाढवणाऱ्या प्रमुख व्याख्यानमाला आयोजकांनी एकत्र येऊन सलग दीड महिने दर्जेदार व्याख्यानांची मेजवाणी देण्याचा उपक्रम सुरू केला, त्याला उत्तम प्रतिसाद मिळत असतानाच करोनामुळे दोन वर्षे त्यात खंड पडला. आता निर्बंधमुक्त वातावरणात पुन्हा एकदा व्याख्यानरूपी ज्ञानोत्सव सुरू होत आहे. मात्र, पूर्वीप्रमाणे व्याख्यानांना दर्दी प्रेक्षक मिळतील का, याविषयी आयोजकांना साशंकता आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात जवळपास ३५ वर्षांपासून व्याख्यानमालांची परंपरा आहे. व्याख्यानाची आवड निर्माण करण्यापासून ते उत्तरोत्तर वाढवत नेण्याचे काम शहरातील अनेक सार्वजनिक मंडळांनी, संस्थांनी केले आहे. करोनापूर्व काळात वर्षभरात एकूण २२ व्याख्यानमाला होत होत्या. त्याअंतर्गत सर्व मिळून २०० हून अधिक व्याख्याने होत होती.

व्याख्याने ऐकणारा ठरावीक वर्ग शहरात आहे. वक्ता आणि व्याख्यानाचा विषय यावर गर्दीचे प्रमाण ठरते. व्याख्यानांसाठी प्रौढांप्रमाणेच अलीकडे युवकांचा व महिलांचा सहभाग वाढू  लागला होता. संयोजकांमध्ये समन्वय नसल्याने एकाच दिवशी, एकाच वेळी वेगवेगळय़ा ठिकाणी व्याख्याने होत होती. ही बाब लक्षात घेऊन सर्व प्रमुख आयोजकांनी एकत्र येऊन व्याख्यानमाला समन्वय समिती स्थापन केली. त्यामुळे विषय आणि वक्ते याविषयी समन्वय साधला जाऊ लागला. त्याचप्रमाणे, एप्रिल व मे महिन्यात सलग दीड महिने दर्जेदार व्याख्यानांची मेजवानी रसिक प्रेक्षकांना मिळू लागली. मार्च २०२० पासून करोनाचा प्रादुर्भाव झाला व त्याचा फटका सार्वजनिक कार्यक्रमांनाही बसला. गेल्या दोन वर्षांपासून व्याख्यानमालांच्या माध्यमातून चालवला जाणारा ज्ञानयज्ञ थंडावला होता. आता करोनाचे निर्बंध शिथिल झाल्याने काहीशा मुक्त वातावरणात पुन्हा व्याख्यानमालांचे  आयोजन सुरू झाले आहे.

दोन वर्षांपासून व्याख्यानमाला बंद होत्या. त्यामुळे व्याख्यानांमधून मिळणाऱ्या आनंदाला प्रेक्षकवर्ग मुकला होता. आता २० एप्रिलपासून ३० मे पर्यंत सलग व्याख्यानमालांचे आयोजन करण्यात आले आहे. श्रोते जमवणे तूर्त अवघड असले तरी, व्याख्यानमालांचा मूळ प्रेक्षक परतेल, असा विश्वास बाळगून आहोत.

– सुहास पोफळे, समन्वयक, व्याख्यानमाला समन्वय समिती