मिणमिणते दिवे, मशालीच्या पाश्र्वभूमीवर रिगाटापटूंनी विलोभनीय रचना तसेच फटाक्यांची डोळे दिपवणारी आतषबाजी, अशा शानदार सोहळ्यात पुणेकरांनी रिगाटाचा थरार अनुभवला.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे गेली ८६ वर्षे ‘रिगाटा दिन’ साजरा केला जातो. यंदाही महाविद्यालयाजवळील नदीच्या दोन्ही काठांवर हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात पाऊणशेहून अधिक बोटींच्या साहाय्याने याच महाविद्यालयातील साडेतीनशे मुला-मुलींनी उत्साहाने भाग घेतला.
दरवर्षी वेगवेगळ्या कथानकाच्या पाश्र्वभूमीवर हा कार्यक्रम आयोजित केला जातो. यंदा डॉ.प्रकाश व डॉ.मंदाकिनी आमटे यांच्या कार्यावर व केंद्रशासनाच्या स्वच्छता अभियानावर आधारित झालेल्या या कार्यक्रमात रिगाटा, कयाकिंगद्वारे बाण, गोल, पंट फार्मेशन, मशाल नृत्य, बॅले आदी विविध रचना सादर केल्या गेल्या. तसेच टेलिमॅचेस, कयाक व रिगाटा शर्यती यामुळे हा कार्यक्रम अधिकच रंगतदार झाला.
या कार्यक्रमास डॉ.लीला पूनावाला, ऑलिम्पिकपटू स्वर्णसिंग विर्क, तसेच ईक्यु टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष दिनेश खळदकर, उद्योजक नचिकेत देशपांडे, रणजित दाते, राजीव कुलकर्णी आदी उपस्थित होते.