राज्यभरातील रिक्षाचालकांमध्ये औत्सुक्याचा विषय असलेली रिक्षा सौंदर्य स्पर्धा यंदा १७ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. आकर्षक सजावट आणि प्रवाशांच्या सुविधांचा विचार करून बनविण्यात आलेल्या रिक्षा घेऊन रिक्षाचालक या स्पर्धेत उत्साहाने आणि हौसेने सहभागी होतात. यंदा स्पर्धचे हे दहावे वर्ष असून, नारायण पेठेतील भिडे पुलानजीक ही स्पर्धा होणार आहे.
प्रादेशिक परिवहन प्राधिकरण समितीचे सदस्य बाबा शिंदे हे गेली दहा वर्षे या स्पर्धेचे आयोजन करत आहेत. पुणे, सांगली, कोल्हापूरसह अन्य शहरांमधूनही या स्पर्धेत रिक्षाचालक मोठय़ा हौसेने सहभागी होतात. रिक्षाचालकांमध्ये वाहतुकीच्या नियमांविषयी जागृती करणे हादेखील या स्पर्धेमागचा उद्देश आहे, अशी माहिती बाबा शिंदे यांनी दिली. या स्पर्धेत रिक्षाची अंतर्गत आणि बाहय़ सजावट बघितली जाते. तसेच या सजावटीबरोबरच रिक्षाचालकांकडून प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सुविधांचाही विचार केला जातो. प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा, मोबाइल चार्जर, पंखा अशा विविध सुविधा रिक्षाचालक त्यांच्या रिक्षांमध्ये उपलब्ध करून देतात. स्पर्धेत याही बाबींचा विचार केला जातो.
महाराष्ट्रातील १५ शहरांमधून या स्पर्धेत रिक्षाचालक सहभागी होतात. स्पर्धेत विजेत्या रिक्षाचालकांना रोख बक्षिसे देऊन चालकांना गौरविण्यात येणार आहे, अशीही माहिती बाबा शिंदे यांनी दिली.
या स्पर्धेदरम्यान रिक्षाचालक रिक्षांची साहसी प्रात्यक्षिकेही सादर करणार आहेत. राज्यस्तरीय गटामध्ये राज्यातील कोणत्याही रिक्षाचालकाला स्पर्धेत सहभागी होता येईल. पुणे विभागातील गटामध्ये सहभागी होणाऱ्या रिक्षाचालकांनी तशी नोंदणी करणे अपेक्षित आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या रिक्षाचालकांनी मोबाइल क्रमांक ९४२१७५४५७४ किंवा ९८२२९१४५५५ येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धा १७ जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता सुरू होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 30th Dec 2015 रोजी प्रकाशित
राज्यस्तरीय रिक्षा सौंदर्य स्पर्धा
आकर्षक सजावट आणि प्रवाशांच्या सुविधांचा विचार करून बनविण्यात आलेल्या रिक्षा घेऊन रिक्षाचालक या स्पर्धेत उत्साहाने आणि हौसेने सहभागी होतात.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 30-12-2015 at 03:10 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rikshaw beauty competition