कात्रजच्या नवीन बोगद्याजवळ भरधाव वाहनाच्या धडकेने पादचारी तरुणाचा मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास हा अपघात झाला.
मंगेश कविराज महामुनी (वय २६, रा. सिंहगड रस्ता) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेशचा साऊंड सिस्टीमचा व्यवसाय आहे. शुक्रवारी दुपारी तो त्याच्या दुचाकीवरून मित्रासह कात्रज महामार्गावरील नवीन बोगद्याजवळ गेला. तेथे त्याला काहीजण भेटायला येणार असल्याने त्याने मित्राला दुचाकी घेऊन जाण्यास सांगितले. त्यानंतर तो रस्त्यालगत थांबला असताना भरधाव वाहनाने त्याला धडक दिली.
मंगेश कात्रज बोगद्याजवळ कुणाला भेटायला आला होता, याचा शोध पोलिसांनी घेतला असता, त्याचे एका तरुणीशी प्रेम होते. त्यावरून त्याच्या घरात वाद सुरू होता. काही दिवसांपूर्वी या तरुणीने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे मंगेशचा मृत्यू हा अपघाती आहे की, आत्महत्या आहे, याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे.