काँग्रेसची बुथपातळीवरील यंत्रणा संपुष्टात आली आहे. याउलट भारतीय जनता पक्षाची बुथ पातळीवरील यंत्रणा सक्षम असल्याने नवमतदारांची नावनोंदणी मोठ्या प्रमाणात झाली आहे. यावर कोणाला आक्षेप असेल, तर बिहारप्रमाणे महाराष्ट्रात मतदार नोंदणीची पडताळणी करण्यास कोणालाही अडविलेले नाही, असा टोला ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी काँग्रेसला लगावला. डिसेंबरपर्यंत जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका पूर्ण होतील, असेही त्यांनी सांगितले.
देशात गेल्या काही दिवसांपासून मतचोरीचा मुद्दा जोरदार गाजत आहे. याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना गोरे म्हणाले, ‘मतचोरीचा मुद्दा मांडत देशात अशांतता, अस्वस्थता पसरविण्यात येत आहे. काँग्रेसने त्यांची पक्षव्यवस्था सुधारावी. वयाची अठरा वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांची नोंदणी भाजपने बूथपातळीवर केली. मात्र, काँग्रेसची अशी यंत्रणा आता अस्तित्वात नाही. त्यामुळे त्यांना याचा त्रास होत आहे.
निवडणूक आयेगाला मतदारांची नोंदणी तपासण्यास कोणीही अडविलेले नाही. पाच वर्षांत मतदारांशी संख्या वाढणारच आहे. भाजपची यंत्रणा पाच वर्षे सातत्याने कार्यरत असते. त्यामुळे निवडणुकीसाठी आम्ही कधीही तयारीत असतो.’
मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत ग्रामविकास मंत्री गोरे म्हणाले, ‘जरांगे आंदोलन का करीत आहेत, ते मला माहीत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करण्यासाठी हे चालले आहे. समाज बांधवांना जे अपेक्षित आहे, ते त्यांना दिले आहे. फडणवीस यांनी दहा टक्के आरक्षण दिले. दीड लाख उद्योजक उभे केले. वसतिगृह शुल्कात सवलत दिली. त्यामुळे जरांगे यांच्या आंदोलनामुळे जे चालले आहे, ते योग्य नाही.’