‘सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’ आणि ‘वेलफेअर मेडिकल फाउंडेशन ट्रस्ट’ यांनी हडपसरमध्ये पुणे-सोलापूर मार्गावर उभारलेल्या ‘विलू पूनावाला मेमोरिअल मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल’चे बुधवारी प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, पूनावाला समूहाचे अध्यक्ष सायरस पूनावाला, अदर पूनावाला, विलू पूनावाला फाउंडेशनच्या अध्यक्ष नताशा पूनावाला यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.
हे रुग्णालय ६० खाटांचे असून त्याचा १०० खाटांपर्यंत विस्तार करण्यात येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. रुग्णालयात पाच शस्त्रक्रियागृहे, अतिदक्षता विभाग, अर्भकांसाठीचा अतिदक्षता विभाग, डायलिसिस केंद्र, प्रयोगशाळा, चोवीस तास सुरू राहणारा ‘इमर्जन्सी-कॅज्युअल्टी’ विभाग आहे. जनरल मेडिसिन व जनरल सर्जरीसह अस्थिरोग, नेत्रविकार, मूत्रविकार, मज्जाविकार, कान-नाक-घशाचे विकार, त्वचाविकार, बालरोग, स्त्रीरोग व प्रसूती या क्षेत्रातील उपचार या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत.
रुग्णालयाचे बांधकाम व ते कार्यान्वित करण्याची जबाबदारी वेल्फेअर मेडिकल फाउंडेशनची असून सीरम इन्स्टिटय़ूटने त्यास आर्थिक साहाय्य दिले आहे. ‘‘रुग्णालयाच्या जनरल वॉर्डमधील अंदाजे एक तृतीयांश खाटा राखून ठेवून निम्न सामाजिक व आíथक वर्गाना सेवा देण्याचा हेतू आहे, तसेच आरोग्य सेवांवरील खर्च कमी करण्याचाही प्रयत्न आहे,’’ असे नताशा पूनावाला यांनी सांगितले.