‘खेडय़ांवर १९९० नंतर जागतिकीकरणाचे तीव्र परिणाम झाले आहेत. माझ्या ‘बारोमास’ सारख्या कादंबऱ्यांतील खेडे जागतिकीकरणानंतरचे असल्यामुळे माझ्या साहित्याला ग्रामीण साहित्य म्हणावेसे मला वाटत नाही,’ असे मत प्रसिद्ध लेखक सदानंद देशमुख यांनी व्यक्त केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती व पुणे विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन आणि अभ्यास केंद्र यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सम्यक साहित्य संमेलनात सदानंद देशमुख आणि प्रसिद्ध नाटककार मकरंद साठे यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी देशमुख बोलत होते.
देशमुख म्हणाले, ‘‘आजच्या मराठी लेखकांपैकी फार कमी लोक चांगले लिहितात. चांगली साहित्यकृती तयार होण्यासाठी लेखकाची मुळेही तेवढी खोल असावी लागतात. वेगळे विषय फार कमी वेळा हाताळले गेलेले दिसतात. मी जेव्हा वाचत होतो तेव्हा ग्रामीण व दलित साहित्य भरात होते. बारा महिन्यांचा निसर्गाचा खेळ आणि शेतकऱ्याचे कष्ट मी लहानपणापासून पाहात आलो होतो. शेतकऱ्याच्या या जगण्याबद्दल मी आधी कविता व कथाही लिहिल्या होत्या. परंतु हे सगळे विस्ताराने मांडावेसे वाटल्यामुळे कादंबरी लिहिली. शेतकऱ्यांपेक्षाही अभावात जगणारे लोक खेडय़ात आहेत. तरीही शेतकरीच आत्महत्येकडे का वळतो हेच ‘बारोमास’चे मूळ आहे.’’
साठे यांनी सांगितले की, ‘‘कोणतीही श्रेष्ठ कलाकृती राजकीय आणि सामाजिक व्यवस्थांची समकालीन मांडणी करणारी आणि
तत्त्वज्ञानाच्या पातळीवर सर्वकालीन असावी लागते. आपल्याकडे नाटय़ कलाकृतींमधील ‘अबसर्डिटी’ फारशी रुजलेली नाही. परदेशी ‘इझम्स’ आपल्याकडे जसेच्या तसे येऊ शकत नाहीत. जोपर्यंत एखाद्या गोष्टीची सहअनुभूती येत नाही तोपर्यंत कलाकृती प्रखर कलाकृती ठरत नाही. आपल्याकडील अबसर्डिटीला राजकीयतेचे व सामाजिकतेचे पाय नसल्याने ती पंगू आहे.’’