पुणे : नोकरदार महिला, विद्यार्थिनी तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. महिलांना त्रास देणाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्यात येत आहे. शहराच्या वेगवेगळय़ा भागांत पोलिसांची गस्त वाढविण्यात आली असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सोमवारी सांगितले.
पोलीस आयुक्त गुप्ता यांनी समाजमाध्यमातून (ट्विटर लाइव्ह) पुणेकरांशी संवाद साधला. या चर्चेत सहभागी झालेल्या नागरिकांनी महिला, ज्येष्ठ नागरिक, शाळकरी मुलींची सुरक्षा तसेच शहरातील वाहतूक समस्येबाबत प्रश्न उपस्थित केले. नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना पोलीस आयुक्तांनी मनमोकळेपणे उत्तरे दिली. नागरिकांनी त्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्या पोलीस आयुक्तांसमोर मांडल्या.
एका सर्वेक्षणानुसार महिलांच्या दृष्टीने सुरक्षित असलेल्या शहरांच्या यादीत पुण्याचा पाचवा क्रमांक आहे. शहरात महिलांच्या दृष्टीने अधिक सुरक्षित वातावरण कसे राहील, यादृष्टीने पोलिसांकडून उपाययोजना करण्यात येणार आहेत का? असा प्रश्न रमेश पाश्र्वनाथ यांनी उपस्थित केला. महिलांच्या दृष्टीने पुणे देशात सुरक्षित शहर म्हणून ओळखले जाते. सुरक्षित शहर म्हणून पुण्याचा नावलौकिक वाढवा, यादृष्टीने पोलिसांकडून विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. नोकरदार महिलांसाठी बडी कॉप, विद्यार्थ्यांसाठी पोलीस काका, पोलीस दीदी या योजना सुरू करण्यात आल्या आहेत, असे पोलीस उपायुक्त गुप्ता यांनी सांगितले. एखाद्या महिलेने पोलिसांकडे तक्रार केल्यास त्वरित दखल घेऊन कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यांच्याशी संवाद साधून समस्या सोडविण्यात येत आहे, असे त्यांनी नमूद केले.
शाळा, महाविद्यालय, गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. अनुचित प्रकार आढळल्यास त्वरित कारवाई करण्याच्या सूचना शहरातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रमुख तसेच गुन्हे शाखेतील पथकांना देण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी सर्वाचे सहकार्य अपेक्षित
शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक कोंडी तसेच समस्या सोडविण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. वाहतूक नियमांचे पालन केल्यास समस्या सुटेल तसेच वाहनचालकांनी पोलिसांना सहकार्य करणे अपेक्षित असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.
मोटारीवरील दिखाऊ पाटय़ांवर कारवाई
काहीजण मोटारीवर पोलीस, आर्मी, महाराष्ट्र शासन, केंद्र शासन असा नामोल्लेख असलेल्या पाटय़ांचा वापर करत असल्याची तक्रार नागरिकांनी पोलीस आयुक्तांकडे केली. मोटारीवर अशा प्रकारच्या पाटय़ांचा वापर करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.