‘‘समाजशिक्षक व्यक्तिमत्त्वांना अन्नुलेखाने मारणे, त्यांची बदनामी करणे आणि तेवढय़ानेही भागले नाही तर त्यांना जगातूनच नाहीसे करणे ही विचारधारा आजचे वास्तव आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी अजूनही मोकाट असल्याबद्दल तीव्र वेदना आणि खंत वाटते. मात्र यांच्या हत्येनंतर गेल्या सहा महिन्यांत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांने निर्भयता न सोडता समितीचा ठरलेला एकही कार्यक्रम रद्द होऊ दिला नाही,’’ अशा शब्दांत डॉ. हमीद दाभोलकर यांनी, विवेकाची चळवळ दाभोलकर यांच्यानंतरही तितकीच प्रखर असल्याच्या भावना व्यक्त केल्या.
कृ. ब. ऊर्फ अण्णा तळवलकर ट्रस्टतर्फे दिला जाणारा ‘समाजशिक्षक’ पुरस्कार स्त्रीमुक्ती चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्यां विद्या बाळ यांच्या हस्ते रविवारी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारताना डॉ. हमीद बोलत होते.
या वेळी निसर्ग संवर्धनासाठी काम करणाऱ्या केतकी घाटे आणि मानसी करंदीकर यांना ‘अवनीमित्र’ पुरस्कार तर ‘निटॉर इन्फोटेक’चे संस्थापक चंद्रशेखर पोतनीस यांना अनुकरणीय उद्योजक पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेचे विश्वस्त श्रीकांत कुलकर्णी या वेळी उपस्थित होते.
हमीद दाभोलकर म्हणाले, ‘‘अंनिसच्या कार्यकर्त्यांनी जादूटोणाविरोधी कायद्याची लढाई लावून धरलेली असताना समितीची प्रचंड बदनामी करण्यात आली. हा कायदा देवाविरोधात आणि एकाच विशिष्ट धर्माविरोधात असल्याचा प्रचारही करण्यात आला. पण या कायद्याअंतर्गत राज्यात आतापर्यंत दाखल झालेल्या ४० गुन्ह्य़ांमध्ये हिंदू, मुस्लिम, बौद्ध आणि इतरही धर्मांशी संबंधित प्रकरणांचा समावेश आहे. या चाळीस गुन्ह्य़ांपैकी ३ घटना नरबळीच्या असून वंचित स्त्रियांच्या लैंगिक शोषणाचे प्रमाणही मोठे आहे.’’
‘प्रत्येकाला परिवर्तनवादी चळवळीत सहभागी होता आले नाही तरी चळवळ समजून घेऊन त्याबद्दल स्वत:ची मते मांडणे आणि चळवळकर्त्यांच्या पाठीशी उभे राहणे महत्त्वाचे आहे’, असे मत विद्या बाळ यांनी व्यक्त केले.
‘टोलच्या विरोधात सगळेच, पण..’
आपल्या भाषणादरम्यान टोलफोडीचा मुद्दा उपस्थित करून विद्या बाळ म्हणाल्या, ‘‘टोलच्या विरोधात सगळेच आहेत; पण म्हणून टोलनाके फोडून तिथे काम करणाऱ्यांना जखमी करणे बरोबर आहे का? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व गाडय़ांना टोल न आकारता पुढे सोडले जाते, इतरांकडून मात्र टोल आकारला जातो. मनसेची दहशत आहे, ते टोल फोडतील म्हणूनच असे केले जाते.’’