नाटककाराच्या लेखनातून प्रतिमासृष्टी उभी राहते. दिग्दर्शक त्यातून आणखी प्रतिमांची निर्मिती करतो. ही वाट गिरीश कर्नाड यांच्या नाटकांतून सापडते. विचारांची वाट पक्की असेल तर, वाटेल तशी मोडतोड करून पुनर्जुळणी करता येते हे कर्नाड यांच्या नाटकांचे बलस्थान आहे, असे मत ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांनी शुक्रवारी व्यक्त केले. गिरीश कर्नाड यांच्या नाटकाची नायिका ‘सिंधू’ सारखी सोसणारी नाही तर, ती ठाम व आग्रही (डिमांडिंग) आहे, अशा शब्दांत त्यांनी गौरव केला.
आशय सांस्कृतिक आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातर्फे आयोजित समग्र गिरीश कर्नाड महोत्सवाचे उद्घाटन सतीश आळेकर यांच्या हस्ते झाले. नाटय़संमेलनाध्यक्ष डॉ. मोहन आगाशे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. संग्रहालयाचे संचालक प्रशांत पाठराबे, आशय सांस्कृतिकचे सचिव वीरेंद्र चित्राव आणि सतीश जकातदार याप्रसंगी उपस्थित होते.
सतीश आळेकर म्हणाले, माझ्यासारख्या लेखन करणाऱ्यांना सुरुवातीच्या काळात विजय तेंडुलकर, बादल सरकार, मोहन राकेश आणि गिरीश कर्नाड या चार नावांची भीती होती. सत्यदेव दुबे यांच्यामुळे या चारही नाटककारांचे शब्द समजले. एवढेच नव्हे तर, भारतीय रंगभूमीची संवेदना दुबे यांनीच प्रथम अधोरेखित केली. कर्नाड यांच्या नाटकातील पात्र शर्ट-पँटमध्ये नाही तर, उत्तरीय सावरतच येतात. नंतर या प्रतिमांचं गारुड माझ्याभोवती िपगा घालू लागले. पुराण, लोककथा, बोधकथा यांना घाबरायचे नाही. तर, त्यातील प्रतिमांची मोडतोड करून पुनर्जुळणी करायची हे एका अर्थाने ‘रिमिक्स’ चे काम कर्नाड यांनी केले. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे प्रश्न उभे ठाकले तेव्हा कर्नाड अग्रभागी असायचे. ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’ चे संचालक (एफटीआयआय), संगीत नाटक अकादमीचे अध्यक्ष ही त्यांची कारकीर्द उल्लेखनीय ठरली.
डॉ. मोहन आगाशे म्हणाले, ‘एफटीआयआय’ मध्ये दररोज चित्रपट पाहून रात्री गिरीश कर्नाड यांच्या घरी तो चित्रपट समजून घेण्यासह मोफत शिक्षणाची परंपरा मी जपली. ते संचालक असताना झालेल्या संपाचा नसिरुद्दीन शहा हा विद्यार्थी पुढारी होता. मात्र, श्याम बेनेगल यांच्या ‘निशांत’ चित्रपटासाठी गिरीश कर्नाड यांनीच नसिरुद्दीनचे नाव सुचविले. लेखक हा हळूहळू मोठा होतो. तर, नट हळूहळू लहान होत जातो. चित्रपट हे करमणुकीचे तर, पुस्तक हे शिक्षणाचे माध्यम असाच आपला समज आहे. पण, चित्रपट पाहूनही शिकता येते हे कर्नाड यांनी मला शिकविले.
प्रशांत पाठराबे यांनी प्रास्ताविक केले. सुप्रिया चित्राव यांनी सूत्रसंचालन केले.

मी मूळचा नाटककारच- कर्नाड
माझ्या व्यक्तिमत्त्वाची विविध रुपे असली तरी मी मूळचा नाटककारच आहे, अशी भावना गिरीश कर्नाड यांनी व्यक्त केली. पैसे कमविण्यासाठी मी चित्रपटात गेलो. मी कन्नडमध्ये लेखन करीत असलो तरी माझी मुळे मराठीमध्येच आहेत. मी मराठी भाषा शिकूनच लहानाचा मोठा झालो आहे. मो. ग. रांगणेकर, केशवराव भोळे, आचार्य अत्रे यांच्याशी माझा ऋणानुबंध होता, या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. मी पुरस्कार स्वीकारत नाही. पण, पुण्यातील मराठी स्नेह्य़ांनी केलेल्या या महोत्सवाविषयी आनंद आहे, असेही त्यांनी सांगितले.