पुणे : OBC community reaction maratha reservation : ‘मराठा समाजाने दंडेलशाही आणि गुंडगिरीच्या जोरावर मुंबईकरांना वेठीस धरून बेकायदा मागण्या मान्य करून घेतल्या आहेत. ओबीसी समाजाच्या ताटातील घास कोणी हिसकाविणार असेल, तर ते कधीही सहन केले जाणार नाही. त्यामुळे राज्यात आंदोलन करून न्याय हक्कासाठी लढा दिला जाईल,’ असा इशारा समता परिषद आणि सकल ओबीसी समाजाच्या वतीने देण्यात आला.
ओबीसी समाजाच्या आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये, या मागणीसाठी समता परिषद आणि सकल ओबीसी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे ‘महाघंटानाद’ आंदोलन करण्यात आले. या मागणीसंदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना निवेदन देण्यात आले. प्रदेशाध्यक्ष मंजिरी घाडगे, विभागीय अध्यक्ष प्रितेश गवळी, शहराध्यक्ष पंढरीनाथ बनकर, माळी महासंघाचे अध्यक्ष दीपक जगताप, महिला अध्यक्षा स्मिता लडकत, उपाध्यक्ष बाळासाहेब लडकत यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
‘ओबीसी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरक्षणाचे लाभ मिळालेले नाहीत. त्यामुळे ओबीसींच्या आरक्षणात कोणी भागीदार नको,’ अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. ‘मराठा समाजाकडून ओबीसींवर अन्याय केला जात आहे. सरकार मागील दरवाजाने त्यांना प्रवेश देऊन ओबीसींवर अन्याय करीत आहे. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य शासनाने काढलेला शासन आदेश रद्द न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल,’ असा इशारा यावेळी देण्यात आला.