संदीप खरे, वैभव जोशींनी समाज माध्यमांची दखल घेत ‘इर्शाद’चं नाव केलं ‘काव्य पहाट’!

पुण्यात आयोजित संदीप खरे आणि वैभव जोशी यांच्या काव्यवाचन कार्यक्रमाचं नाव इर्शादवरून काव्य पहाट असं बदलण्यात आलं आहे.

sandeep khare vaibhav joshi poetry program irshaad
संदीप खरे, वैभव जोशी यांनी दिवाळी पहाटसाठी आयोजित केलेल्या इर्शाद कार्यक्रमाचं नाव बदललं.

‘इर्शाद’ या नावावरून सध्या पुण्यात बरीच चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. हे नाव कवी संदीप खरे आणि वैभव जोशी यांच्या एका काव्यवाचन कार्यक्रमाचं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते हा कार्यक्रम सादर करतात. या कार्यक्रमाचं आयोजन दिवाळी पहाटच्या निमित्ताने पुण्यात करण्यात आलं होतं. मात्र, मराठी सण असलेल्या दिवाळीतील कार्यक्रमाला उर्दू नाव देण्यावरून त्यावर सोशल मीडियावर आक्षेप घेण्यात आला. हा वाद वाढत असल्याचं पाहिल्यानंतर संदीप खरे आणि वैभव जोशी यांनी या कार्यक्रमाचं नाव काव्य पहाट असं केलं आहे. या विषयावरून पुण्यात सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

संदीप खरे आणि वैभव जोशी हे ‘इर्शाद’ हा कवितांचा कार्यक्रम सादर करतात. करोना काळातील निर्बंध शिथिल केल्यानंतर राज्य सरकारने दिवाळी पहाटच्या कार्यक्रमांना परवानगी दिली आहे. त्यामुळे पुण्यातील आयोजकांनी या कार्यक्रमाचं दिवाळी पहाटच्या निमित्ताने आयोजन केलं. मात्र, त्याच्या इर्शाद या नावावर आक्षेप घेतला गेला. सोशल मीडिावर त्यावरून चर्चा सुरू झाली.

कार्यक्रमाच्या नावावर आक्षेप घेतला जात असल्याचं लक्षात येताच संदीप खरे आणि वैभव जोशी यांनी कार्यक्रमाचं नाव बदलून काव्य पहाट असं केलं आहे. त्यांच्या या कृतीचं सोशल मीडियावर काही नेटिझन्सकडून स्वागत होत आहे. मात्र, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक, वास्तुविशारद गणेश मतकरी यांनी अशा प्रकारे कार्यक्रमाचं नाव बदलण्यावर आक्षेप घेतला आहे.

गणेश मतकरींची फेसबुक पोस्ट!

“संदीप खरे आणि वैभव जोशी बराच काळ वेगवेगळ्या निमित्ताने करत असलेल्या कार्यक्रमाला ‘इर्शाद’ हे नाव बदलून ‘काव्य पहाट’ करायला लागणं ही अत्यंत सिली गोष्ट आहे. मूळ नाव काव्याच्या परफॉर्मन्सशी जोडलेलं नाव आहे. शिवाय कार्यक्रम वर्षभर होतो, तो दिवाळीसाठीच केला नसल्याने ते नाव मुद्दाम खोडसाळपणा करुनही देण्यात आलेलं नाही. असल्या गोष्टींचा विजय सेलिब्रेट करताना खऱ्या महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होतंय, केलं जातंय. या कार्यक्रमाला आजवर कोणत्याही मराठी माणसाने आक्षेप घेतला नव्हता, पण आज आपल्यातल्याच अनेकांना हे बरोबरच आहे असं वाटायला लागलंय. अशा हार्मलेस गोष्टींना उगाचच धर्म पुढे आणून टारगेट केलं जाणं ही गोष्ट बरी नाही. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावतो”, अशी पोस्ट गणेश मतकरींनी आपल्या फेसबुक वॉलवर केली आहे.

त्यामुळे आता नाव बदलण्याच्या समर्थनासोबतच त्या कृतीवर नाराजी व्यक्त करणाऱ्याही प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त होऊ लागल्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sandeep khare vaibhav joshi diwali pahat program irshaad name changed kavya pahat pmw

Next Story
राष्ट्रवादीच्या पुणे शहराध्यक्षपदासाठी काकडे, निकम, पाटील यांची चर्चा
ताज्या बातम्या