येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेला प्रसिद्ध अभिनेता संजय दत्त शिक्षेच्या दीड वर्षांच्या काळात संचित (पॅरोल) आणि अभिवाचन (फलरे) रजेवर सुमारे चार महिने (११८ दिवस) कारागृहाबाहेरच आहे. आता पुन्हा दुसऱ्या वर्षी त्याला फलरे रजा मंजूर करण्यात आली आहे. कारागृहाच्या नियमावलीप्रमाणेच संजय दत्तला रजा देण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला कारागृह प्रशासनाने मंगळवारी चौदा दिवसांची अभिवाचन रजा मंजूर केली आहे. दत्तला न्यायालयाने पाच वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्यातील अठरा महिने शिक्षा त्याने यापूर्वीच भोगली आहे. २१ मे २०१३ पासून संजय दत्त येरवडा कारागृहात आहे. या काळात संजय दत्तने स्वत:च्या पायाचे दुखणे, पत्नीचे आजारपण अशी कारणे देत रजा मिळवली. त्यात मुदतवाढ घेतली.
त्याने २१ मे २०१३ पासून वर्षभरात ११८ दिवस कारागृहाबाहेर काढले होते. त्याला देण्यात येणाऱ्या संचित व अभिवाचन रजेच्या विरोधात काही जणांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त करीत ‘ज्या पद्धतीने संजय दत्तच्या विनंत्या कारागृह व विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मान्य करण्यात आल्या आहेत, त्या दुसऱ्या कैद्यांच्या बाबतीत दिसून येत नसल्याचे’ म्हटले होते. कारागृहाकडून दिल्या जाणाऱ्या फलरे आणि पॅरोल यामध्ये मोठे बदल करणे गरजेचे असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले होते.
दरम्यान, कारागृह प्रशासनाने हे सर्व कायद्यानुसार असल्याचे म्हटले आहे. ‘आमच्या दृष्टीने संजय दत्त हा इतर कैद्यांप्रमाणेच आहे. त्याला कारागृहाच्या नियमांप्रमाणे रजा देण्यात आल्या आहेत,’ असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
संजय दत्तला मिळालेल्या रजा :
२१ मे २०१३ रोजी येरवडा कारागृहात.
– १ ऑक्टोबर २०१३ पासून १४ दिवसांची फलरे मंजूर
– १४ ऑक्टोंबर २०१३ रोजी १४ दिवसांची मुदतवाढ
– २१ डिसेंबर २०१३ रोजी ३० दिवसांचे पॅरोल मंजूर
– २० जानेवारी २०१४ रोजी पॅरोलमध्ये ३० दिवसांची मुदतवाढ
– १८ फेब्रुवारी २०१४ रोजी पॅरोलमध्ये ३० दिवसांची मुदतवाढ

संजय दत्त चौदा दिवसांच्या सुटीवर
अभिनेता संजय दत्त कारागृहाच्या मागील दरवाजातूून चौदा दिवसांच्या सुटीवर बुधवारी दुपारी बाहेर पडला. कारागृह प्रशासनाने त्याला मंगळवारी चौदा दिवसांची अभिवाचन रजा (फलरे) मंजूर केली होती. संजय दत्त याने अर्ज केल्यानंतर त्याला अभिवाचन रजा मंजूर झाली होती. कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर बुधवारी दुपारी त्याला येरवडा कारागृहातून सोडण्यात आले. याबाबत येरवडा कारागृहाचे अधीक्षक योगेश देसाई यांनी सांगितले, की संजय दत्तला सोडताना कारागृहाबाहेर आंदोलन होण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली होती. त्यामुळे त्याला पाठीमागील दरवाजातून बाहेर सोडण्यात आले.
फलरे व पॅरोल
कारागृहातील शिक्षा झालेल्या कैद्यांना संचित रजा (पॅरोल) आणि अभिवाचन रजा (फलरे) अशा दोन प्रकारच्या रजेवर बाहेर सोडले जाते. यातील अभिवाचन रजा शिक्षेचा विशिष्ट कालावधी पूर्ण केल्यानंतर कैद्यांना दिली जाते. तर, संचित रजा ही कैद्याचे नातेवाईक आजारी असतील किंवा कार्यक्रम असेल तर विभागीय आयुक्तांकडून ही रजा दिली जाते. कैद्याच्या कुटुंबातील व्यक्ती आजारी आहे किंवा त्याच्या घरी एखादा महत्त्वाचा कार्यक्रम आहे, अशा वेळी कैदी संचित रजेसाठी अर्ज करू शकतो. संचित रजा देण्यासाठी त्याच्यावर गुन्हा दाखल असलेल्या पोलीस ठाण्याचा अहवाल, कारागृहातील त्याचा वर्तणूक अहवाल, त्याचे नातेवाईक आजारी असेल तर त्याचा अहवाल हा संबंधित विभागीय आयुक्तांकडे पाठविला जातो. ते पाहून विभागीय आयुक्त कार्यालयाकडून त्याला सात ते तीस दिवसांपर्यंत संचित रजा मंजूर केली जाते.