गुजरातच्या पर्यटनाचे आकर्षण असलेला ‘सापुतारा मान्सून फेस्टिव्हल’ १६ ऑगस्टपासून सुरू होत आहे. ७ सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या उत्सवाच्या ‘पॅकेज टूर्स’ ‘टूरिझम कॉर्पोरेशन ऑफ गुजरात लिमिटेड’ने (टीसीजीएल) बाजारात आणल्या आहेत. ‘टीसीजीएल’चे निवासी व्यवस्थापक सनातन पांचोली आणि पर्यटन अधिकारी फारूख पठाण या वेळी उपस्थित होते.
गुजरातच्या दक्षिण टोकावर सह्य़ाद्रीच्या जंगलात सापुतारा वसले असून हिंदू पुराणांनुसार रामाने आपल्या वनवासातील ११ वर्षांचा काळ याच जंगलात व्यतीत केला असे मानले जाते. महिनाभर चालणाऱ्या सापुतारा मान्सून फेस्टिव्हलमध्ये पर्यटकांसाठी साहसी खेळ, वॉटर गेम्स, हेरिटेज वॉक, खाद्य जत्रा, लेसर शो अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर सहलींच्या पॅकेजेसमध्ये गीरा धबधबा, सापुतारा तलाव, महाल जंगल, वाघाई बोटॅनिकल गार्डन, शबरीधाम अशा विविध ठिकाणांचा समावेश आहे. याशिवाय सापुताऱ्यातील स्थानिक संस्कृती आणि डांग आदिवासी संस्कृती जाणून घेण्यासाठीच्या सहलीही या पॅकेजेसमध्ये आहेत, अशी माहिती या वेळी देण्यात आली.