पिंपरी महापालिकेच्या ‘सारथी’ उपक्रमाची लोकप्रियता व उपयुक्तता लक्षात घेऊन एक जानेवारीपासून ही सुविधा आठवडाभर दररोज २४ तास उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
यापूर्वीचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या संकल्पनेतून ‘सारथी हेल्पलाइन’ (८८८८००६६६६) प्रत्यक्षात उतरली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते १५ ऑगस्ट २०१३ मध्ये त्याचे उद्घाटन करण्यात आले. पालिका, केंद्र व राज्य शासनाच्या सेवांविषयीची माहिती याद्वारे दिली जात होती. पालिकेशी संबंधित विविध तक्रारींची नोंद घेऊन त्याची सोडवणूक करण्याचे प्रयत्न या हेल्पलाइनच्या माध्यमातून करण्यात येत होते. अल्पावधीत ‘सारथी’ची लोकप्रियता राज्यभर पसरली. २६ जानेवारी २०१४ला ‘सारथी’ची इंग्रजी, तर २०१५ ला हिंदूी आवृत्ती प्रकाशित झाली. तीन वर्षांत ‘सारथी’चा तब्बल पाच लाख नागरिकांनी लाभ घेतला. राज्य शासनाचे काही पुरस्कारही सारथीला मिळाले आहेत. या सर्व गोष्टी लक्षात घेता, आधी दोन पाळय़ांमध्ये होणारे ‘सारथी’चे कामकाज आता २४ तास होणार आहे. सेवा हमी कायद्याची माहितीही याद्वारे मिळू शकणार आहे. नागरिकांना आवश्यक असणारी माहिती दूरध्वनीवरून उपलब्ध होऊ शकणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 31st Dec 2015 रोजी प्रकाशित
पिंपरी पालिकेत उद्यापासून ‘सारथी’ सुविधा २४ तास
‘सारथी’चे कामकाज आता २४ तास होणार आहे. सेवा हमी कायद्याची माहितीही याद्वारे मिळू शकणार आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 31-12-2015 at 03:17 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sarathi facilities 24 hours pcmc