पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला टाइम्स हायर एज्युकेशन आशिया अवॉर्ड २०२२ह्ण चे द डेटा पॉइंट रिसर्च इम्प्रुव्हमेंट अ‍ॅवॉर्ड जाहीर झाले. संशोधन क्षेत्रातील विशेष कामगिरीबद्दल हा पुरस्कार विद्यापीठाला मिळाला. टाइम्स हायर एज्युकेशनतर्फे प्रसिद्ध होणाऱ्या क्रमवारीतून आशिया खंडातील शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठे यांचे मूल्यमापन केले जाते. त्यानुसार आशियातील विद्यापीठांच्या संशोधनाच्या कामगिरीच्या मूल्यमापनामध्ये पाचशे विद्यापीठे आणि उच्च शैक्षणिक संस्थांमधून अंतिम गटात आठ शैक्षणिक संस्थांची संशोधनातील कामगिरी उत्तम होती. त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सर्वोत्तम ठरले. या पुरस्काराबद्दल कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी सर्व घटकांचे अभिनंदन केले. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षाच्या संचालिका डॉ. सुप्रिया पाटील आदी उपस्थित होते. विद्यापीठातील हे संशोधन उत्पादकता वाढवण्यासोबत संदर्भसूची म्हणूनही मोठय़ा प्रमाणात वापरले जात असल्याचे,  २०११ ते २०२० या कालावधीत संशोधन दुप्पट झाल्याचे, त्याचा संदर्भ म्हणून आणि माहितीसाठी मोठय़ा प्रमाणात नागरिकांना उपयोग झाल्याचे निरीक्षणही त्यात नोंदवण्यात आले आहे.

नामकरणसंशोधनासाठी मिळालेला पुरस्कार विद्यापीठाच्या गुणवत्तेची पावती आहे. हे यश संलग्न सर्व घटकांचे आहे. भविष्यात विद्यापीठाची कामगिरी अधिक उंचीवर नेण्याचा प्रयत्न आहे.

– डॉ. कारभारी काळे, प्रभारी कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ