पुणे : ससून रूग्णालयातील उपअधीक्षक कार्यालयात आलेली वैद्यकीय देयके मंजूर करुन देतो, असे सांगून रुग्णांच्या नातेवाईकांकडून पैसे घेणाऱ्या लिफ्टमनला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. जालिंदर चंद्रकांत कुंभार (वय ५५) असे लाचखोर लिफ्टमनचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका नोकरदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. नोकरदाराने एक लाख ४३ हजार रुपयांचे वैद्यकीय बिल मंजुरीसाठी जून महिन्यात सादर केले होते. बिल मंजूर करण्यासाठी तक्रारदार ससून रूग्णालयात हेलपाटे मारत होते.

हेही वाचा >>> पुणे : डंपरच्या धडकेत आठ वर्षांच्या बालकाचा मृत्यू; जमावाने डंपर पेटविला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जालिंदर कुंभार लिफ्टमन आहे. कुंभार रुग्णांच्या नातेवाईकांकडून बिले घेऊन ती मंजूर करुन देतो, असे सांगून दोन टक्के रक्कम घेत होता. त्याने तक्रारदाराकडे तीन हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी करण्यात आली. तेव्हा त्याने लाच मागितल्याचे उघड झाले. ससून रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ बुधवारी दुपारी तक्रारदाराकडून लाच घेताना कुंभार याला पकडले. पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त अधीक्षक डाॅ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक माधुरी भोसले, हवालदार नवनाथ वाळके, सरिता वेताळ, प्रवीण तावरे, चंद्रकांत कदम यांनी ही कारवाई केली.