पुणे : राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०नुसार पायाभूत वर्गांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) मैत्री बालमनाशी ही हस्तपुस्तिका दोन भागात तयार केली आहे. राज्यातील तीन ते सहा या वयोगटातील विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या अंगणवाडी सेविका, बालवाटिका शिक्षिका यांच्यासाठी ही हस्तपुस्तिका मार्गदर्शक आणि उपयुक्त असून, या हस्तपुस्तिकेचे दोन्ही भाग एससीईआरटीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

एससीईआरटीच्या सेवापूर्व शिक्षण आणि बालविकास विभागाचे उपसंचालक डॉ. दीपक माळी यांनी ही माहिती दिली. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०नुसार पूर्व शालेय शिक्षणाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तीन ते आठ या वयोगटाला पायाभूत शिक्षणामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार ‘राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा : पायाभूत स्तर २०२२’ विकसित करण्यात आला आहे. त्यात तीन ते सहा वयोगटातील वर्षनिहाय बालवाटिका १, २ आणि ३ असे टप्पे करण्यात आले आहेत. या स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तकाऐवजी कृतिपत्रिका, शिक्षकांसाठी मार्गदर्शक हस्तपुस्तिका उपलब्ध करण्याची तरतूद आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०नुसार एससीईआरटीने तयार केलेल्या आधारशिला बालवाटिका १, २ व ३ या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी यंदापासून सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, आधारशीला अभ्यासक्रम २०२४वर आधारित मैत्री बालमनाची मार्गदर्शक हस्तपुस्तिका भाग १ व २ विकसित करण्यात आलेल्या आहेत. https://www.mas.ac.in/index.php?tct-nipun_pury_prathimik या दुव्यावर हस्तपुस्तिका उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मार्गदर्शक हस्तपुस्तिका भाग १मध्ये बालशिक्षणातील प्रारंभिक वर्षे, वर्ग व्यवस्थापन, बालकांचे समावेशन आणि दिनचर्या या घटकांचा समावेश आहे. तसेच यातील वेळापत्रकाची रचना आधारशीलामधील वेळापत्रकाच्या धर्तीवर करण्यात आली आहे. ती नऊ वेगवेगळ्या संकल्पना, विषयांवर आधारित आहे. या शिवाय गंमत गाणी गोष्टी, अभ्यासक्रमाची ध्येय, क्षमता, अध्ययन निष्पत्ती याबाबतची माहितीही देण्यात आली आहे. तर मार्गदर्शक हस्तपुस्तिका भाग-२ मध्ये वयोगटनिहाय १८१ कृती देण्यात आल्या आहेत. बालभारतीने विकसित केलेल्या कृतीपत्रिका आणि पाठ्यसाहित्याशी हस्तपुस्तिकेचा समन्वय साधण्यात आलेला आहे.