मोफत शिक्षणापासून ते वर्षांला तीन लाख रुपये.. अशा शुल्कापर्यंत राज्यातील प्राथमिक शिक्षण पोहोचले आहे. मनपाची शाळा ते आयबी, आयजीसीएसई यासारखे आंतरराष्ट्रीय बोर्ड अशा शिक्षण क्षेत्राच्या वाढलेल्या पसाऱ्यात शाळांच्या शुल्काचाही चढता क्रम पाहायला मिळत आहे.
पुणे जिल्ह्य़ात दरवर्षी साधारण दीड लाख मुले पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतात. पुण्यात सध्या पाच बोर्डाच्या शाळा आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (राज्य मंडळ), केंद्रीय शिक्षण मंडळ (सीबीएसई), इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (आयसीएसई), इंडियन जनरल सर्टिफिकेट सेकंडरी एक्झामिनेशन (आयजीसीएसई) आणि आयबी या बोर्डाच्या शाळा आहे. यातील आयजीसीएसई आणि आयबी हे आंतरराष्ट्रीय बोर्ड आहेत. जसे जसे नवे बोर्ड आले त्याप्रमाणे शाळांच्या शुल्काचा आलेखही वाढत गेलेला दिसतो. सध्या सर्वसाधारणपणे राज्य मंडळाच्या शाळा या कमी शुल्क असलेल्या आणि आयजीसीएसई आणि आयबीच्या शाळा या सर्वाधिक शुल्काच्या अशी वर्गवारी झालेली दिसते.
मनपा शाळा किंवा ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पहिली ते आठवीपर्यंत मोफत शिक्षण मिळते. त्याच्या थोडासा वरचा थर येतो, तो म्हणजे मराठी माध्यमाच्या अनुदानित शाळांचा. अगदी दोन-तीन हजार रुपये वर्षांला अथपासून ते फारतर दहा हजार रुपयांच्या घरात या शाळांचे शुल्क आहे. त्यानंतर येतात राज्य मंडळाच्याच इंग्रजी माध्यमाच्या शाळा १० हजार ते २५ हजार रुपयांपर्यंत या शाळांचे शुल्क असल्याचे दिसून आले. सीबीएसई बोर्डाच्या शाळांचे शुल्क हे आणखी थोडे वाढते. २० हजारापासून ते अगदी १ लाख रुपयांपर्यंत या शाळांचे एका वर्षांचे शुल्क दिसून येते. आयसीएसई शाळांचे शुल्कही साधारण सीबीएसई शाळांप्रमाणेच दिसते. त्यानंतर आयजीसीएसई आणि आयबीच्या शाळा या शाळांचे शुल्क मात्र वर्षांला अगदी ३ लाख रुपयांर्प्यत पोहोचले आहे.
सध्या राज्य मंडळाच्या शाळा संख्येने सर्वाधिक असल्या, तरी सीबीएसई आणि आयसीएसईच्या शाळांना पालकांचे प्राधान्य दिसून येते. आयजीसीएसई आणि आयबी या आंतरराष्ट्रीय मंडळांच्या शाळांची संख्याही वाढत आहे. मुलांची शाळा हा प्रतिष्ठेचा विषय बनल्यामुळे आता पालकांनीही शुल्काचीही चढती भाजणी स्वीकारल्याचे दिसत आहे.