पुणे : शालेय विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी शाळांमध्ये आता ‘वॉटर बेल’ वाजवली जाणार आहे. केरळमध्ये सुरू केलेल्या उपक्रमाचे राज्यातील शाळांमध्ये अनुकरण करण्यात येणार असून दिवसभरात तीन वेळा घंटा वाजवण्यासाठी वेळापत्रकात वेळ निश्चित करण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत.
दिवसभरात योग्य त्या प्रमाणात पाणी न प्यायल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. वय आणि उंचीनुसार मुलांनी किमान दीड ते दोन लिटर पाणी पिणे आवश्यक असते. मात्र, अभ्यास आणि खेळाच्या नादात मुलांना शाळेच्या वेळेत पाणी पिण्याचे भान राहात नाही. त्यामुळे पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी घंटा वाजवण्याचा उपक्रम राबवण्यात यावा. वेळापत्रकात दिवसभरात तीन घंटा वाजवण्यासाठी वेळ निश्चित करावी. जेणेकरून मुलांना आवश्यकतेनुसार पाणी पिता येईल. त्यानंतर ठरावीक वेळेनंतर पाणी पिण्याची मानसिकता तयार होऊन पुढे त्याचे सवईत रुपांतर होईल. तसेच या वेळेत मुलांना स्वच्छतागृहाचा वापर करण्याचीही मुभा द्यावी. वॉटर बेल उपक्रमाच्या अंमलबजावणीचा अहवाल शिक्षण आयुक्तांनी सर्व शाळांकडून घ्यावा, असे शासन परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
भरपूर पाणी प्यायल्याने मेंदूचा विकास होतो, एकाग्रता वाढते, बद्धकोष्ठता कमी होते. मुलांना पाणी प्यायला सांगताना शाळेत स्वच्छतागृहाची चांगली व्यवस्था असणेही तितकेच आवश्यक आहे. ‘वॉटर बेल’ वाजवताना मुलांची अभ्यासातील एकाग्रता भंग होणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे.
– डॉ. सुनील गोडबोले, ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ