पुणे : महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानतर्फे आंबेगाव ब्रुद्रुक येथे साकारण्यात येत असलेल्या शिवसृष्टीचा दुसरा टप्पा पूर्णत्वास आला असून येत्या शिवजयंतीला (दि. १९ फेब्रुवारी) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती असेल, असे प्रतिष्ठानचे मुख्य विश्वस्त जगदीश कदम यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले. विश्वस्त विनीत कुबेर, सल्लागार संदीप जाधव व शिवसृष्टीचे व्यवस्थापक अनिल पवार या वेळी उपस्थित होते.

कदम म्हणाले, ‘सुमारे ८७ कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात स्वदेश, स्वधर्म व स्वभाषा ही तीन तत्त्वे अधोरेखित करण्यात आली आहेत. या टप्प्यात स्वागत कक्ष, टाईम मशीन थिएटर आणि तुळजा भवानी मातेचे मंदिर यांचा समावेश करण्यात आला आहे. टाइम मशीन थिएटर या टप्प्यातील मुख्य आकर्षण असून यात ३३ मिनिटांच्या चित्रफितीच्या माध्यमातून एकाच वेळी ११० प्रेक्षकांना मॅपिंग, होलोग्राफी, फिजिकल इफेक्ट्स अशा आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे फिरत्या चित्रपटगृहात शिवकाळातील इतिहासाचा अनुभव घेता येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच स्वागतकक्षात ४ टप्प्यांमध्ये निर्माण होणाऱ्या शिवसृष्टीच्या प्रतिकृतीसह छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात काढलेल्या, जगातील प्रसिद्ध संग्रहालयांमध्ये असलेल्या चित्रांच्या छायाप्रती ठेवण्यात आल्या आहेत.’ ‘तुळजा भवानीचे मंदिरही याच टप्प्यात साकारण्यात आले आहे. हे मंदिर प्रतापगडावरील भवानी मातेच्या मंदिराची तंतोतंत प्रतिकृती असून अगदी बांधकामात वापरण्यात आलेला दगडदेखील सारखाच आहे. सोमवारी, १७ फेब्रुवारीला मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे,’ असेही कदम यांनी सांगितले.