पुण्यातला ‘कचराकोंडी’चा प्रश्न चांगलाच पेटला आहे. य़ा प्रश्नावर योग्य मार्ग निघावा, यासाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर ट्वीट करून मुख्यमंत्र्यांना संबोधलं होतं. यावर मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे उत्तर देणं टाळलं होतं. राष्ट्रवादीच्या राज्यसभेतल्या खासदार वंदना चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना मेसेज केल्यावर त्यांचं उत्तर त्यांनी लगेचच पाठवलं. दोन्ही खासदारांनी पाठवलेल्या संदेशांबाबत मुख्यमंत्र्यांनी अशी वेगळी भूमिका का घेतली आहे, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
पुण्यामध्ये खासदार वंदना चव्हाण यांनी शनिवारी भाजपच्या कार्यपद्धतीवरून आणि कचराकोंडीच्या प्रश्नावरून भाजपला धारेवर धरलं. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांनी पाठवलेला मेसेज सर्वांसमोर वाचून दाखवला. ‘कचरा प्रश्न उद्यापर्यंत सोडवू’ असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
त्या पुढे म्हणाल्या की, आघाडी सरकारच्या काळात शहरात कचरा, पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी पालकमंत्री अजित पवार यांनी महापौरांना परदेश दौऱ्याची काढलेली तिकीट रद्द करायला लावली होती. मात्र सध्याच्या पालकमंत्र्यांना कचरा प्रश्नाचे गांभीर्य नाही. कचरा प्रश्न पेटला असताना पालकमंत्री आणि महापौर परदेश दौऱ्यावर गेले ही बाब निषेधार्ह आहे, असे त्यांनी सांगितले.
उरुळी देवाची आणि फुरूसुंगी येथील कचरा डेपो बंद करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक झाले असताना, कचरा डेपो बंद न झाल्यास मंत्रीपदाचा राजीनामा देईन, असा इशारा शिवसेनेचे स्थानिक आमदार आणि राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिला आहे. येथील कचरा प्रश्न सोडवण्यासाठी शिवतारे यांनी ग्रामस्थांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, कचरा डेपो बंद करण्याच्या मागणीवर ग्रामस्थ ठाम असून, त्यांनी तोंडाला काळी पट्टी बांधून मूक आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, यापुढील चर्चा फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीच केली जाईल, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.