भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे नेते नागरिकांच्या करातून जमा झालेल्या पैशातून जाहिराती करत आहेत. मात्र शासकीय जाहिरातींमध्ये सस्वातंत्र्याचे जननायकांचे, महात्मा गांधींसह प्रमुख स्वातंत्र्य सेनानींचे फोटो तसेच राष्ट्रीय तिरंगा ध्वजाची संहिता, तिन्ही रंगांचा मतिथार्त आणि संविधान प्रसिद्ध करून त्यांचा गौरव करावा, अशी मागणी काँग्रेसचे राज्य प्रवक्ता आणि राजीव गांधी स्मारक समितीचे संस्थापक अध्यक्ष गोपाळ तिवारी यांनी पत्रकार परिषदेत केली.

यावेळी शहर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष सुभाष थोरवे, ‘गांधी जाणुयात’चे संस्थापक अध्यक्ष संकेत मुनोत, भाऊ शेडगे, संजय मानकर, संजय अभंग, महेश अंबिके, शंकर शिर्के, अशोक काळे यावेळी उपस्थित होते.

गोपाळ तिवारी म्हणाले की, ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवताना तिरंगा ध्वजाचा मतिथार्त सत्ताधाऱ्यांनी समजून घेणे गरजेचे आहे. तिरंगा खादी आणि स्वदेशी कापडाचा असावा असे सरकारी धोरण होते. मात्र मोदी सरकारने चीन कडून पॅालीस्टर झेंडे घेण्याचा घाट घातला आहे. स्वदेशी कापडातून देखील देशांतर्गत तिरंगा ध्वजांचे उत्पादन केंद्रातील सरकारला शक्य झाले असते. शासकीय पैशांची उधळपट्टी करून निकृष्ट झेंडे खरेदी करण्याची वेळ प्रशासनावर आली नसती.