‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’ आणि ‘झोपी गेलेला जागा झाला’ या नाटकांद्वारे रसिकमनांवर मोहिनी घालणारे; चित्रपट, दूरदर्शन मालिका आणि जाहिरातींमधील आपल्या अभिनयाने मराठी रंगभूमीवर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते आत्माराम भेंडे (वय ९mu02३) यांचे शनिवारी खासगी रुग्णालयात निधन झाले. अमेरिकेमध्ये वास्तव्यास असलेली मुलगी भारतामध्ये परतल्यानंतर आज, रविवारी भेंडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
पत्नी अभिनेत्री आशा भेंडे आणि मुलगा संगीतकार नंदू भेंडे यांच्या निधनानंतर आत्माराम भेंडे एकाकी झाले होते. गेल्या काही वर्षांपासून ते पाषाणमधील अथश्री येथे वास्तव्यास होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, वार्धक्यामुळे त्यांची प्रकृती उपचारांना पुरेसा प्रतिसाद देत नव्हती. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर त्यांची प्राणज्योत मालवली.