कुमठेकर रस्त्यावरील लक्ष्मी निवास इमारतीमध्ये चोरटय़ांनी ज्येष्ठ महिलेचा गळा दाबून खून केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. सदनिकेतील आठ तोळे दागिने आणि रोख ७० हजार रुपये चोरून नेले आहेत. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आशा नारायण लगड (वय ७२, रा. लक्ष्मी निवास, सदाशिव पेठ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत पोलीस उपायुक्त मकरंद रानडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मी निवास इमारत ही आशा यांच्या मालकीची असून ती टेलरिंगसाठी भाडय़ाने दिली आहे. त्या पहिल्या मजल्यावरील सदनिकेत एकटय़ाच राहतात. त्यांना दोन मुले असून एक शनिवार पेठेत आणि दुसरा शेजारीच सदाशिव पेठेत राहतो. सोमवारी दुपारी त्या आळंदी येथे गेल्या होत्या. सायंकाळी चारच्या सुमारास त्या परत घरी आल्या. त्यांनी चहा घेतल्याचेही शेजाऱ्यांनी पाहिले. त्यानंतर आशा या झोपलेल्या दिसून आल्या. या वेळेस त्या कधीच झोपत नसल्याने शेजाऱ्यांनी त्या आजारी असतील म्हणून त्यांच्या नातवाला फोन केला. त्यांचा नातू घरी आला असता त्याला अ‍ॅटॅक आला असावा वाटले म्हणून हॉस्पिटलला फोनही केला. पण, घरातील सोन्याचे दागिने चोरी गेल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी पोलिसांना कळविले. तत्काळ विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अर्जुन सकुंडे, राजेंद्र सावंत हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांना घरातील आठ तोळ्याचे दागिने व रोख ७० हजार रुपये चोरून नेल्याचे आढळून आले. आशा यांच्या अंगावर जखमा नाहीत. चोरीच्या उद्देशानेच त्यांचा साडेचार ते साडेपाच दरम्यान गळा दाबून खून करण्यात आला आहे. सोमवारचा दिवस असल्यामुळे बाजारपेठ बंद असते. याबाबत सीसीटीव्ही चित्रीकरण शोधण्याचे काम सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शहाजी सोळुंके, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे, पी. आर. खैरे, यांनी घटनास्थळाची पाहणी केली.