ज्येष्ठ संगीत समीक्षिका आणि ‘उंबरठा’ या चित्रपटाच्या कथालेखिका शांता हरी निसळ (वय ८६) यांचे वृद्धापकाळाने सोमवारी निधन झाले.
शांता निसळ या पूर्वाश्रमीच्या शांता व्यंकटेश जोशी. त्यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९२८ रोजी पुण्यात झाला. एम. ए., डी.टी. या पदव्यांसह ‘संगीत’ या विषयात पीएच.डी. संपादन केली. विद्यार्थिदशेत असताना १९४२ च्या लढय़ात त्यांनी सहभाग घेतला होता. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हुजूरपागा प्रशालेत शिक्षिका म्हणून त्यांनी काम केले. शांता निसळ यांच्या ‘बेघर’ या कादंबरीवर डॉ. जब्बार पटेल यांनी ‘उंबरठा’ या चित्रपटाची निर्मिती केली. स्मिता पाटील यांच्या अभिनयामुळे हा चित्रपट गाजला. तर, याच कादंबरीवर वसंत कानेटकर यांनी ‘पंखाला ओढ पावलाची’ हे नाटक लिहिले. शांता निसळ यांचे ‘विसंवाद’ ही कादंबरी, ‘सूरभि’ कथासंग्रह आणि ‘सौभाग्यकांक्षिणी’ हे नाटक अशी त्यांची साहित्य संपदा आहे. सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचे त्यांनी अनेक वर्षे संगीत समीक्षण केले होते.