पुणे : ‘देशाच्या विकासासाठी सृजन, संशोधन क्षेत्रात अधिक व्यापक सुधारणा आवश्यक आहेत. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या सर्वसमावेशक वापरातून सर्व नागरिकांना सर्व प्रकारच्या सुविधा कशा देता येतील, याचा विचार करायला हवा,’ असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी शनिवारी व्यक्त केले.
‘कमीतून अधिकांसाठी अधिक’ हे सूत्र प्रत्यक्षात अमलात आणायचे असल्यास करुणा, नावीण्य आणि व्यापक दृष्टिकोनासह राजकीय इच्छाशक्ती गरजेची आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या वतीने डॉ. माशेलकर लिखित ‘मोअर फ्रॉम लेस फॉर मोअर’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यानिमित्ताने पुस्तकाचे सहलेखक डॉ. सुशील बोर्डे यांनी डॉ. माशेलकर यांच्याशी संवाद साधला. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय केळकर उपस्थित होते.
डॉ. माशेलकर म्हणाले, ‘सध्या जगातील अनेक लक्षाधीश मानसिक समाधानासाठी सामाजिक कार्याकडे वळत आहेत. कमीत कमी संसाधनात जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्याचा हा काळ आहे. मात्र, हे करत असताना आपण नक्की कुणासाठी काम करत आहोत, याचा विचार करायला हवा. केवळ नफा मिळवण्यासाठी काम न करता, अधिकाधिक लोकांना अधिक चांगल्या दर्जाची सुविधा देण्यासाठी काम करणे अपेक्षित आहे. त्यासाठी विज्ञानाचा वापर करून नवे सृजन करायला हवे.’
‘सध्या उत्पादन तंत्रज्ञानाच्या बाबतीत चीन जागतिक स्तरावर आघाडीवर आहे. मात्र, तंत्रज्ञानाच्या सर्वसमावेशक वापरात भारत हा चीनपेक्षाही पुढे आहे. कमीत कमी साधनात अधिकाधिक उत्पादन मिळवायचे असल्यास तंत्रज्ञान सर्वसमावेशक असणे गरजेचे असते. नवे उद्योग उभारत असताना अनेक अडथळे येत असतात. मात्र, ‘कमीतून अधिकांसाठी अधिक’ या सूत्राच्या आधारे यश संपादन करता येते,’ असेही त्यांनी सांगितले. ‘तुमचे मूळ विसरू नका. तुमच्याकडे असलेल्या ज्ञानाचा वापर, तुम्ही जिथून येता, त्यांच्यासाठी करायला हवा,’ असा सल्लाही डॉ. माशेलकर यांनी दिला.
‘देशाच्या टेलिकॉम क्षेत्रात ‘जिओ’ ही मोठी क्रांती होती. त्याकाळात जिओसमोर अनेक अडचणी होत्या. जिओने दिलेली सुविधा आणि सूट हा धाडसी निर्णय होता. अनेकांनी त्यावर टीका केली. मात्र, नव्या कल्पना आणि सृजनाच्या आधारे जिओने प्रत्येक अडचणींवर मार्ग शोधला. ‘कमीतून अधिकांसाठी अधिक’ या सूत्रामुळेच जिओचा प्रयोग प्रचंड यशस्वी झाला,’ असे बोर्डे यांनी नमूद केले.
ते म्हणाले, ‘आरोग्याच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. मात्र, हे तंत्रज्ञान सर्वसमावेशक नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना अनेक मुलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागते. सगळेच आजार वाढत आहेत. प्राथमिक तपासणी आणि तातडीने निदान यात मोठा फरक आहे. देशाच्या आरोग्य क्षेत्रात ‘कमीतून अधिकांसाठी अधिक’ या सूत्राने काम करून नवे तंत्रज्ञान आणि सृजन आवश्यक आहे. त्यामुळे मध्यस्थांची संख्या कमी होऊन सामान्यांना थेट लाभ होणे शक्य होईल.’
भारत ‘जुगाड’ करण्यात पुढे आहे, असे म्हटले जाते. मात्र, देशासाठी जुगाड हा मोठा धोका आहे. त्यात उत्पादनाच्या दर्जाची आणि सुरक्षेची शाश्वती नसते. त्यामुळे जुगाडू देश, अशी आपली ओळख होता कामा नये. – डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ
करुणा असल्याशिवाय ‘कमीतून अधिकांसाठी अधिक’ हे सूत्र फायद्याचे ठरत नाही. तंत्रज्ञानाचा वापर स्त्रिया आणि समाजातील वंचित घटकांसाठी करणे, हाच या सूत्राचा उद्देश आहे. त्यातूनच खरे यश मिळवता येते. – सुशील बोर्डे, सहलेखक, मोअर फ्रॉम लेस फॉर मोअर
