छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी महापालिकेच्या वतीने २५ व २६ जूनला दोन दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये विविध सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहेत.
महापौर मोहिनी लांडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. चिंचवड येथील रामकृष्ण मोरे नाटय़गृहात होणाऱ्या महोत्सवाचे उद्घाटन महापौरांच्या हस्ते होणार असून कोल्हापुरातील शाहू मिल्कचे कार्यकारी संचालक समरिजतसिंह घाटगे प्रमुख पाहुणे आहेत. याशिवाय, खासदार सुप्रिया सुळे, शिवाजीराव आढळराव, गजानन बाबर, आमदार विलास लांडे, लक्ष्मण जगताप, अण्णा बनसोडे आदी उपस्थित राहणार आहेत.
मंगळवारी सायंकाळी सहा वाजता मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ समन्वयक अॅ. संभाजी मोहिते यांचे ‘राजर्षी शाहू राजा व माणूस’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. तर, सात वाजता ‘जय जय महाराष्ट्र’ हा कार्यक्रम होणार आहे. २६ जूनला सायंकाळी सहा वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते छत्रपती शाहू पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. कामगार नेते जयसिंगराव पोवार यांना शाहू पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सायंकाळी सात वाजता अशोक हांडे यांचा ‘मराठी बाणा’ हा मराठी गीतांचा कार्यक्रम होणार आहे.