आपल्या अजरामर नाटय़कृतींनी जागतिक रंगभूमीवर स्वतंत्र नाममुद्रा उमटविलेल्या विल्यम शेक्सपिअरच्या काही नाटय़कृती कथारूपात वाचकांसमोर आल्या आहेत. या नाटय़कथा मराठीमध्ये अनुवादित करणारे गणेश व्यंकटेश ढवळीकर यांच्या निधनानंतर ५० वर्षांनी ‘शेक्सपिअरच्या नाटय़कथा’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.
गणेश ढवळीकर यांनी १९५५ च्या सुमारास अनुवादित केलेल्या या कथा गेली ६० वर्षे बासनात राहिल्या होत्या. ढवळीकर यांची नात मीरा आपटे यांनी ज्येष्ठ रंगकर्मी श्रीराम रानडे यांना हे बाड दाखविले. या कथा आता भारद्वाज प्रकाशनने ‘शेक्सपिअरच्या नाटय़कथा’ या पुस्तकाद्वारे वाचकांसमोर आणल्या आहेत. वाई येथील द्रविड हायस्कूलमध्ये इंग्रजीचे अध्यापन करणारे ढवळीकर हे मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले. ढवळीकर यांच्या १३५ व्या जन्मदिनाचे औचित्य साधून रानडे यांनी पुस्तकाच्या निर्मितीची कथाच सांगितली. रानडे म्हणाले, ‘इंग्रजीचे अध्यापन करताना ढवळीकर यांनी शेक्सपिअरची नाटके कथारूपात आणताना स्वतंत्र लेखनही केले होते. १९६५ मध्ये त्यांचे निधन झाले. ते हयात असताना त्यांचे लेखन पुस्तकरुपामध्ये प्रकाशित होऊ शकले नाही. त्यांचे बरेचसे साहित्य काळाच्या ओघात नष्ट झाले. मात्र, शेक्सपिअरच्या अनुवादित नाटय़कथा त्यांची नात मीरा आपटे यांच्याकडे होत्या. याचे वाचन केल्यानंतर हा अनमोल ठेवा वाचकांसमोर आला पाहिजे या हेतूने नाटय़कथांचे पुस्तक प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला. गेली चारशे वर्षे शेकसपिअर रंगभूमीवर राज्य करीत आहे. त्याच्या नाटकापासून कोणीही दूर राहू शकले नाही. गोपाळ गणेश आगरकर, कुसुमाग्रज, िवदा करंदीकर यांनीही शेक्सपिअरची नाटके मराठीमध्ये अनुवादित केली आहेत. मात्र, ढवळीकर यांनी केलेला कथारूप अनुवाद मराठी साहित्याला वेगळा आयाम देणारा ठरला आहे. या अनुवादामध्ये ६० वर्षांपूर्वीच्या भाषाशैलीचा प्रत्यंतर येतो. या कथांचे पुस्तक करताना मूळ लेखनामध्ये कोणताही बदल केलेला नाही. केवळ मराठी शुद्धलेखनाच्या नव्या नियमांनुसार बदल करून घेण्यात आला आहे. नव्या पिढीपर्यंत शेक्सपिअर पोहोचविण्यासाठी या कथा महत्त्वाच्या ठरणाऱ्या आहेत, असेही रानडे यांनी सांगितले.
……..
काय आहे पुस्तकात – ‘र्मचट ऑफ व्हेनिस’, ‘सिंबेलाईन आगस्टस सीझर’, ‘मॅकबेथ’, ‘तुफान’, ‘हॅम्लेट’, ‘लिअर राजा’, ‘रोमिओ अँड ज्युलिएट’ या कथारूप नाटय़कृती
– गणेश ढवळीकर यांचा ‘स्वप्नातील जग’ हा लेख
– वि. वा. शिरवाडकर, ग. त्र्यं. माडखोलकर, वि. ह. कुलकर्णी, मु. श्री. कानडे, पु. ल. देशपांडे आणि प्रा. ग. प्र. प्रधान या मराठीतील ज्येष्ठ लेखकांचे शेक्सपिअरच्या संदर्भातील लेख.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shakespeare translation book
First published on: 27-05-2015 at 03:15 IST