येरवडा कारागृहातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठीच कुख्यात गुंड शरद मोहोळला तळोजा कारागृहात हलविण्यात आले आहे. याबाबत कारागृह प्रशासनाकडून त्याला तळोजा कारागृहात हलविण्याची मागणी करण्यात आली होती. ती न्यायालयाने मान्य केल्यानंतर त्याला नुकतेच तळोजा कारागृहात हलविण्यात आले आहे.
येरवडा कारागृहातील कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्यामुळे त्याची रवानगी तळोजा कारागृहात करण्याची मागणी येरवडा कारागृहाकडून प्रशासनाकडून करण्यात आली होती. ती मागणी विशेष न्यायाधीश एस. पी. तावडे यांनी मान्य केली. ८ जून २०१२ रोजी मोहोळ याने कतिल सिद्दीकाचा खून केला होता. तेव्हापासून तो नियमांचे पालन करत नाही. कारागृहातील कर्मचाऱ्यांशी वाद घालत आहे. ७ मे रोजी त्याने कारागृह अधीक्षकांचीही हुज्जत घातली होती. मोहोळ याच्या विरोधी गटाचे लोक कारागृहातच आहेत. त्यामुळे त्याच्यात वाद होण्याची शक्याता आहे. त्यामुळे त्याला तळोजा कारागृहात हलविण्याची मागणी कारागृहाकडून करण्यात आली होती. तळोजा कारागृहात व्हीडीओ कॉन्फरन्सिंगची सोय उपलब्ध असल्याने त्याला खटल्याच्या कामासाठी हजर करता येऊ शकते. या बाबी लक्षात घेऊन न्यायालयाने मोहोळला तळोजा येथे हलविण्याची मागणी मान्य केली.
याबाबत मोहोळचे वकील अॅड. अतुल पाटील यांनी सांगितले, की मोहोळ यांच्या नातेवाइकांना कोणतीही पूर्वकल्पना देता मोहोळ हालविण्यात आले आहे. येरवडा कारागृहात परत आणावे म्हणून उच्च न्यायालयात जाणार आहोत.  

सिद्दीकी खटला व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे
इंडियन मुझाहिदीनचा संशयित दहशतवादी कतिल सिद्दीकी खुनाच्या आरोपातील अटक आरोपी कुख्यात गुंड शरद मोहोळ याला तळोजा कारागृहात हालविण्यात आले आहे. या कारागृहात व्हीडीओ कॉन्फरन्सिंगची सोय असल्यामुळे या खटल्याच्या कामाजावेळी कॉन्फरन्सिंगद्वारेच हजर केले जाणार आहे.