राज्यातील वाढता जातीय तेढ आणि ब्राह्मण विरोधक असा आरोप होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी (२१ मे) ब्राह्मण संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ब्राह्मण महासंघाने मात्र बैठकीचे निमंत्रण नाकारले असून शरद पवार यांनी मंत्री छगन भुजबळ आणि अमोल मिटकरी यांनी केलेल्या विधानांबाबत आधी भूमिका जाहीर करावी, अशी मागणी ब्राह्मण महासंघाने केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या पुढाकारातून ही बैठक मार्केटयार्ड परिसरातील निसर्ग मंगल कार्यालय येथे सायंकाळी पाच वाजता होणार आहे. या बैठकीला २० ते २२ ब्राह्मण संघटना उपस्थित राहणार आहेत. बैठकीसाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून सुरक्षिततेच्या दृष्टीने बैठकीला येणाऱ्यांना आपल्याबरोबर पेन आदी वस्तू आणण्यास मनाई करण्यात आली आहे. या बैठकीनंतर राज्यातील तणावपूर्ण वातावरण निवळेल, असा दावा प्रदीप गारटकर यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, राजकीय पक्ष समाजातील प्रत्येक घटकाबरोबर काम करत असताे. सध्या राज्यातील राजकीय वातावरण काहीसे दूषित झाले आहे. राष्ट्राच्या उभारणीत मोलाचे योगदान असलेल्या ब्राह्मण समाजाच्या मनातील गैरसमज दूर करणे हा या बैठकीचा उद्देश आहे. राज्यातील बहुतांश ब्राह्मण संघटनांना त्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. काही संघटना राजकीय पक्षांशी संबंधित आहेत. त्यामुळे त्यांना यामध्ये राजकारण वाटत आहे. मात्र संवाद साधणे आणि समाजातील वातावरण सुदृढ ठेवण्याचा प्रयत्न या बैठकीच्या माध्यमातून केला जाणार आहे, असे आयोजक, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी सांगितले.