राज्याचा राज्यप्राणी असलेल्या ‘शेकरू’च्या संवर्धनाचा सापशिडीच्या खेळातून विद्यार्थ्यांना मिळालेला संदेश, विद्यार्थ्यांनी रद्दी कागद आणि प्लास्टिकच्या बाटल्यांमधून बनवलेली शेकरूची प्रतिकृती, आणि शेकरू संवर्धनाविषयीची लोकगीते..अशा वातावरणात सोमवारी शेकरू महोत्सवाला सुरुवात झाली.
राज्याच्या पर्यावरण विभागाने आयोजित केलेला हा महोत्सव १५ जुलैपर्यंत चालणार असून या कालावधीत हे विद्यार्थी आपापल्या भागांत शेकरू संवर्धनाविषयीचे जनजागृतीपर कार्यक्रम राबवणार आहेत.
पश्चिम घाट परिसरातील तीस शाळांतून आलेले विद्यार्थी आणि शिक्षक महोत्सवात सहभागी झाले आहेत. पर्यावरणमंत्री संजय देवतळे यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. देवतळे म्हणाले, ‘‘नियमांच्या अंमलबजावणीबरोबरच प्रत्यक्ष निसर्गसंवर्धनात नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी पर्यावरण विभाग प्रयत्नशील आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून केलेली जनजागृती समाजात पर्यावरण संवर्धनविषयक संदेश पोहोचवण्यासाठी उपयुक्त ठरेल.’’ यापुढे दर वर्षी १ ते १५ जुलै या कालावधीत पश्चिम घाटाच्या संवर्धनाबाबत नवी थीम घेऊन हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
१९९० च्या सुमारास डॉ. रीनी बोर्गेस या परदेशी संशोधिकेला शेकरूविषयक संशोधनात मदत करणारे स्थानिक गाइड चिंडू धोंडू अस्वले यांचा या वेळी देवतळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भीमाशंकर येथील दुंडा रामा शेंगाळे आणि सखाराम धोंडगे या कलाकारांनी शेकरू संवर्धनावरील लोकगीते सादर केली.
विद्यार्थ्यांनी प्लास्टिकचा वापर टाळण्याचा संदेश देण्यासाठी जुन्या कपडय़ांपासून बनवलेल्या पिशव्या तसेच स्थानिक भागांत उगवणाऱ्या गवताच्या विशिष्ट जातींपासून बनवलेल्या टोप्या सादर केल्या. प्रा. गणेश मर्गाझ, ‘वंचित जनविकास’ संस्थेचे आनंद कारवार, स्थानिक वनस्पतींच्या बियांच्या संवर्धनासंबंधी कार्य करणारे ‘बायफ’ या संस्थेचे डॉ. संजय पाटील, सर्पमित्र अशोक शिरोळे आदींशी मुक्त संवाद साधण्याची संधीही विद्यार्थी आणि शिक्षकांना मिळाली.