पुणे : चांदणी चौकात कोथरूडकडे उतरणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीचे आणि उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. मुळशी आणि मुंबईहून येणारी वाहने एकाच वेळी महामार्गावर एकत्रित येत असल्याने चांदणी चौकात वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेले लोखंडी कठडे (बॅरिगेट्स) शिवसेनेकडून सोमवारी हटविण्यात आले आणि वाहतूक कोंडीच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.

चांदणी चौकातील वाहतूक कोंडीबाबत शिवसेनेच्या वतीने अनेक वेळा संबंधित खात्याशी निगडित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मात्र, कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नसल्याने लोखंडी अडथळे हटवून आंदोलन करण्यात आल्याचे शिवसेना उपशहर प्रमुख राहुल दुधाळे यांनी सांगितले. चांदणी चौकातून कोथरूडला जाणारा रस्ता आठ दिवसांत चालू करू असे आश्वासन संबंधित काम करणाऱ्या एनसीसी लि. या कंत्राटदार कंपनीने दिले आहे. आठवडाभरात रस्ता चालू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला. जिल्हा संपर्क संघटक स्वाती ढमाले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अमोल मोकाशी या वेळी उपस्थित होते.

उड्डाणपुलाचे काम तातडीने पूर्ण करावे

शहराचे पश्चिमेकडील प्रवेशद्वार म्हणून ओळख असलेल्या चांदणी चौकातूनच (एनडीए चौक) शहरात प्रवेश करताना वाहन चालकांच्या नाकीनऊ येत आहेत. या चौकात उड्डाणपुलाचे काम सुरू असल्यामुळे भूगाव परिसरातील प्रवाशांना वळसा घालून महामार्गावर उतरावे लागते. तसेच बावधन परिसरातून येणाऱ्या वाहनांनाही महामार्गावर येऊनच कोथरूडचा रस्ता धरावा लागत आहे. मात्र, त्यासाठी महामार्गावर येताना मुंबईकडून आलेल्या भरधाव वाहनांपासून सावध राहावे लागते. त्यामुळे येथे वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. महामार्ग सोडून कोथरूडकडे जाताना लगेचच येथे धोकादायक तीव्र उतार आहे. हा उतार संपल्यानंतर लगेचच मुळशीकडे जाण्याचा रस्ता आहे. मुंबईकडून येणारी अवजड वाहने, टॅंकर व सिमेंट मिक्सरची वाहने या दिशेने जाताना त्यांना इंग्रजी ‘यू’ आकाराचे वळण घ्यावे लागते. त्यामुळे कोंडी होते. त्यामुळे उड्डाणपुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी होत आहे.