पिंपरी : चाकण नगरपरिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी शिवसेना (ठाकरे) आणि शिवसेना (शिंदे) या दोन्ही शिवसेनेची युती झाली आहे. शिवसेनेकडून (शिंदे) माजी आमदार दिवंगत सुरेश गोरे यांच्या पत्नी मनीषा गोरे या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरल्या आहेत. त्यांना शिवसेना (ठाकरे) पक्षाचे आमदार बाबाजी काळे यांनी पाठिंबा दिला आहे.  शिवसेनेची विभागणी झाली असली, तरी गोरे कुटुंबाचे पक्षासाठीचे योगदान, सहकार्य आणि सहानुभूती पाहून पाठिंबा दिल्याचे काळे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या युतीवरून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे माजी आमदार दिलीप मोहिते यांनी आमदार काळे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

चाकण नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी १२ प्रभाग असून २५ नगरसेवक आहेत. एक प्रभागातून तीन आणि ११ प्रभागातून प्रत्येकी दोन नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. येथे शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या दोन्ही प्रमुख पक्षात लढत होण्याची चिन्हे असतानाच दोन्ही शिवसेना नगराध्यक्षपदासाठी एकत्र आल्या आहेत.

शिवसेनेकडून (शिंदे) माजी आमदार दिवंगत सुरेश गोरे यांच्या पत्नी मनीषा गोरे या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरल्या आहेत. मनीषा गोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना  शिवसेनेचे (ठाकरे) आमदार बाबाजी काळे, शिवसेनेचे (शिंदे) जुन्नरचे सहयोगी आमदार शरद सोनावणे यांच्यासह दोन्ही शिवसेनेचे तालुक्यातील नेतेही उपस्थित होते.

याबाबत आमदार बाबाजी काळे म्हणाले, ‘सुरेश गोरे हे २०१४ मध्ये शिवसेनेचे आमदार होते. करोना काळात त्यांचे निधन झाले. शिवसेनेत फूट पडल्यानंतर खेड तालुक्यातील काही जण एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. सुरेश गोरे यांनी तालुक्याचे नेतृत्व केले. त्यांच्या मार्गदर्शानातून आम्ही घडलो. मी मूळ शिवसेनेकडून (ठाकरे) २०२४ मध्ये आमदार म्हणून निवडून आलो. गोरे कुटुंबासह शिवसेना (शिंदे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीत मला सहकार्य केले. सुरेश गोरे यांच्या पत्नी मनीषा गोरे नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत. सुरेश गोरे यांना आदरांजली म्हणून मनीषा गोरे यांना निवडून आणावे असे आम्ही ठरवले आहे. त्यांना सहानुभूती आहे. शिवसेनेची विभागणी झाली असली तरी, गोरे कुटुंबाचे योगदान पाहून नगराध्यक्षपदासाठी शिवसेना (ठाकरे) पक्षाचा उमेदवार उभा केला जाणार नाही. नगराध्यक्षपदासाठी मनीषा गोरे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळेच त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेलो होतो. केवळ नगराध्यक्षपदासाठी पाठिंबा दिला आहे. तालुकास्तरावर हा निर्णय झाला आहे. त्यामुळे याला युती म्हणता येणार नाही.’

नगरसेवकपदासाठी शिवसेनेचे (ठाकरे) उमेदवार उभे केले आहेत. निवडून येण्याची क्षमता असलेल्यांना उमेदवारी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे खेड-आळंदीचे माजी आमदार दिलीप मोहिते म्हणाले, ‘खेड तालुक्यात दोन्ही शिवसेना सुरुवातीपासून एकत्रच आहेत. आमदार बाबाजी काळे हे दुसऱ्या पक्षातून शिवसेनेत (ठाकरे) आले आहेत. त्यामुळे ते सोईनुसार भूमिका घेतात. त्यांचे कार्यकर्ते शिवसेना (शिंदे) पक्षाचे काम करतात. शिवसेनेत (ठाकरे) निष्ठावंत शिवसैनिक आणि दुसऱ्या पक्षातून आलेले असे दोन मतप्रवाह आहेत. निष्ठावंत शिवसैनिकांना विश्वासात घेतले जात नाही. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष चाकण, आळंदी, खेड या तिन्ही ठिकाणी स्वतंत्र निवडणूक लढवत आहे’.